“आय ॲम ओके ,यू आर ओके ! ” (भाग तीन)

transactional analysis- Part 3

हाय फ्रेंड्स !

काल आपण व्यक्तिमत्त्व घडण होत असताना या P-C-A ची भूमिका विचारात घेतली. आजच्या शेवटच्या टप्प्यावर यातील चार महत्त्वाच्या धारणा , दोन व्यक्तीमधील संवाद आणि फाइल्स यांच्यातला संबंध बघणार आहोत.

या ट्रांजेक्शनअल एनालिसिसचा उपयोग कुठे कुठे होतो ?

  • विवाहपूर्व समुपदेशन आणि मार्गदर्शन यामध्ये अत्यंत उपयोगी.
  • मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम पालकांनी हे शिकवून त्यांच्यातला व मुलांमधला संवाद सुधारेल यावर भर द्यावा.
  • मनोविकारांचे रोगनिदान समजावून सांगण्यासाठी.
  • किशोरवयीन मुले, युवक आणि कोणत्याही नात्यात सुसंवाद साधण्यासाठी.

या फाइल्सच्या माध्यमातून, काही धारणा तयार असलेल्या दिसतात :
— आय ॲम नॉट ओके, यू आर ओके !
–आय एम ओके, यू आर नॉट ओके !
–आय ॲम नॉट ओके, यू आर नॉट ओके!
–आय ॲम ओके, यू आर ओके !

“आय ॲम नॉट ओके पासून आय ॲम ओके” पर्यंतचा प्रवास हा बालपणात मिळणाऱ्या स्ट्रोक्स वर अवलंबून असतो .

१) मागे पाहिल्याप्रमाणे आईबाबा का रागवतात ते कळत नाही . कधीतरी ते चांगले वागतात . त्यामुळे एक गोंधळ मुलांच्या मनात असतो. म्हणूनच अगदी तीन-साडेतीन महिन्यापर्यंत मूल हे स्वतःला ‘आय ॲम नॉट ओके, यू आर ओके!’ समजत असतं; कारण मला भूक लागली की तुम्ही खाऊ देता .मला संरक्षण हवे, तुम्ही संरक्षण देतात . मी लहान आहे, तुम्ही मोठे आहात. या भावना मुलांच्या मनात पक्क्या असतात. या ‘आय ॲम ओके’ या भावनेचा विकास हा ते स्वतः आणि इतर लोक यांच्यातील नात्यांवर अवलंबून असतो.

कुठलीही तुलना किंवा लेबलिंग न लावता झालेला त्यांचा विकास आणि मिळालेली दाद, कौतुक हे जर नजरेतून, शब्दातून ,कृतीतून व्यक्त होत असेल तर ते ‘आय ॲम ओके’ या धारणेकडे वाटचाल करतात. परंतु लहानपणापासून उपहास केल्यामुळे किंवा डॉमिनंट पालक, शिक्षक किंवा त्रास देणारे बरोबरीचे मित्र असतील तर ‘आय ॲम नॉट ओके’ भावना प्रबळ होते. अशा लोकांना आत्मविश्वास कमी पडतो. होपलेसची भावना तयार होते.

 

आणि व्यक्तीला डिप्रेशन येते. म्हणूनच जोपर्यंत उत्तरार्ध आपल्या बाजूने असतो म्हणजे मूल ‘यू आर ओके’ म्हणत असतं तोपर्यंतच पूर्वार्ध बदलायला हवा .

२) “आय ॲम नॉट ओके, यू आर नॉट ओके!” मुलांना जर योग्य स्ट्रोक मिळाले नाही , त्यांचे पाय ओढले गेले तर पूर्वीची आपली ‘ओके’ची जागा बदलून मुले आपल्याला ‘नॉट ओके’मध्ये टाकतात. आणि हळूहळू इतर सर्वच लोकांना त्याच वर्गीकरणात टाकले जाते. आता स्तुतीही केली तरी त्यामागे काहीतरी वेगळा हेतू किंवा डाव आहे असं त्यांना वाटतं. अशी व्यक्तिमत्त्व आयुष्याला कंटाळलेली, व्यक्तिमत्त्व विकृती असलेली टोकाच्या मनोवृत्तीची आणि आत्महत्या करू  शकणारी असतात.

३) “आय ॲम ओके, यू आर नॉट ओके!” या व्यक्ती स्वतःला दोषी समजतात आणि त्यामुळे त्या दुसऱ्याला आपले सावज बनवतात .आपल्या या अपयशाचे खापर ते दुसऱ्यांवर फोडतात. बहुतेक वेळा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या धारणेचे असतात. काल आपण बघितले, त्याप्रमाणे ‘दो आँखे बारा हाथ’मधले कैदी! असे लोक स्वतःच्या जखमांवर स्वतःच फुंकर घालतात.

४) “आय ॲम ओके, यू आर ओके!” ही धारणा! जी आपले आयुष्य अतिशय परिणामकारक जगतात. ज्यांची ॲडजस्टमेंट पावर खूप चांगली असते. चांगली जीवन स्थिती असणारे, asserative प्रकारचे लोक. ही एक आदर्श धारणा आहे. म्हणूनच मुलांना सूचना देताना एक फक्त योग्य पद्धतीने आणि योग्य त्या सूचना देणे, सतत आयसीयूमध्ये न ठेवता मनमुक्त बागडू खेळू देणे , त्यांना वेळ देणे , कौतुक करणे आणि परफेक्शनची अपेक्षा न ठेवणे, जागरूकता दाखवणे पण हेरगिरी न करणे, आहे तसा स्वीकार करणे आणि रोल मॉडेल बनणे. या गोष्टींमुळे व्यक्ती नेहमी “आय ॲम ओके, यू आर ओके” म्हणू शकेल.

आता वळू या सुखसंवादाकडे !
P.== P ,A ==A , C== C ! पॅरेण्ट आणि पॅरेण्ट, एडल्ट आणि एडल्ट , चाईल्ड आणि चाइल्ड यांच्यात होणाऱ्या संवादांना , “समांतर संवाद किंवा पॅरलल ट्रांजेक्शन” असे म्हणतात. असे होणारे संवाद नेहमीच चांगले होतात.

उदाहरणार्थ, एडल्ट फाईलमधून एडल्ट फाईलमध्ये केलेला संवाद! “मी आज खूप थकले आहे” त्यावर रिॲक्शन येते, “ओके जा आणि आराम कर!” असा A ==A संवाद नेहमीच आदर्श समजला जातो.

P==P हा संवाद चांगला होतो, निरर्थक असतो. त्यातून फार काही निष्पन्न होत नाही. उदाहरणार्थ, बस स्टॉपवर बसची वाट पाहणारे दोन जण! “या बसेसचं काही खरं नाही पाहा!” “हो ना, एकही बस वेळेवर येईल तर शपथ!” “बसमध्ये गर्दी तरी किती असते!” “हो! आपल्या इकडे काहीही नियम, शिस्त नाहीच मुळी!”

“पुण्याची वगैरे सिटीबस सिस्टीम बघा!” “हो ना, सगळ्या शहरातून अशी सिस्टीम असते. आपल्याकडे मात्र सगळ्यात घोळ!”

या संवादात बघा कुठेही खटकाखटकी नाही; पण त्यातून काही हाती पण लागलेले नाही; फक्त एकमेकांना अनुमोदन देणे चालू आहे. म्हणजे केवळ बस येईपर्यंतचा टाइमपास! C==C यांच्यातही कम्युनिकेशन बरेचदा चांगलं होतं. अधूनमधून थोड्या हाणामाऱ्या होतात; पण परत विसरून ते खेळायला लागतात. फार काही घडत एडल्ट A चा पॅरेण्ट P किंवा चाइल्ड C कुणाशीही होणारा संवाद हा सुसंवादच असतो!

परंतु P ते C किंवा उलटा C ते P असा होणारा संवाद हा कायमस्वरूपी विसंवाद किंवा वितंडवाद होऊ शकतो म्हणजेच क्रॉस कम्युनिकेशन !

बरेचदा चाइल्ड= चाइल्ड मध्येही संवाद होताना मध्येच काहीतरी बिनसते, त्यावेळी त्यांच्यातला असच कोणी तरी चाइल्ड फाईलमधून एडल्ट फाईलमध्ये जाऊन भाषण करते आणि गुंता  सुटतो.
उदा: “चला आपण घर घर खेळू या !”  “मी आई बनेल, तू मुलगी!”

“नाही बॉ ! नेहमी नेहमी तूच आई बनते.”

पण लगेच एखादी आपल्या child फाईलमधून बाहेर पडून aduld मध्ये जाते आणि म्हणते,

” ठीक आहे ! यावेळी तू आई बन, पुढील वेळी मी बनेन!” आणि वाद मिटतो.

एखाद्या वेळी नवरा आजारी आहे . अशा वेळी कम्युनिकेशन होतं. त्यावेळी दोघेही जणांनी आपली भूमिका ( फाईल) बदलली तर संभाषण छान होतं. त्याला आजारी असल्यामुळे काहीच चांगलं लागत नाही, कशालाही चव लागत नाही. म्हणजे तो आता C फाईलमध्ये शिरतो. अशा वेळी बायको एक छान आई (A )बनून संभाषण करेल तर ते चांगलं होईल. नाही तर “बस झाले तुझे चवीचे नखरे! दिवसभर तुझ्यामागे पदार्थ करत बसायला मला वेळ नाही !” असे पॅरेण्ट =चाइल्ड संभाषण हे क्रॉस कनेक्शन झाल्यामुळे चिडचिड ,भांडण सुरू होईल.

एखाद्या मैत्रिणीने नवीन जबाबदारी अंगावर घेतलेली आहे. अशा वेळी तिला प्रश्न पडतो! “काय माहिती मी हे काम करू शकेन की नाही?” “अगं नक्की जमेल बघ तुला ! प्रयत्न कर. आपोआप सगळे यायला लागेलं!” C=A. आता एक उदाहरण बघा, “अगं माझं पॅन कार्ड कुठे ठेवलेस ? आणि नवीन टाय पण दिसत नाही.”

“कुठे ठेवलाय तुम्ही? नेहमी वस्तू कुठे टाकतात काय माहिती? ( यावर मूर्ख , अव्यवस्थित बेअक्कल, संस्कार नाही.) “तरी मी हजार वेळा सांगत असते की वस्तू जागच्या जागी ठेवा म्हणून!”

काय मंडळी मग युद्ध पेटणारच की! साधा सरळ प्रश्न विचारला गेलेला आहे. एडल्ट फाईलमधून! त्यावर उत्तरही ॲडल्टमधूनच यायला हवं होतं. पण इथे भान विसरून चाइल्ड आणि पॅरेण्ट दोन्ही फाईल ओपन झालेल्या दिसतात. उत्तर कसे असू शकेल?

“मी बघितलं नाही पण बघायला मदत करते!” A==A फाईल

म्हणजेच जिथे क्रॉस कम्युनिकेशन होतं तिथे प्रॉब्लेम येतो. संभाषण करताना नेहमीच असं म्हणतात, की विचारपूर्वक करावं. म्हणजे प्रतिक्रिया न देता प्रतिसाद द्यावा ! त्यावेळी मला वाटतं यामागे “ट्रांजेक्शन एनालिसिसच” असतं. समोरच्याचे बोलणे कुठल्या फाईलमधून येते आहे ? हे समजून घेऊन जर योग्य पॅरलल फाईलमधून आपले प्रतिसाद दिले जात असतील, तर कधीही विसंवाद होऊ शकणार नाही.

परंतु आपण त्या वेळेला कोणत्या फाईलमध्ये असतो, त्यानुसार आपले प्रतिसाद जातात. म्हणून प्रॉब्लेम येतो. आपल्याला लहानपणापासून सांगतात की, विचार करून बोलावे! म्हणजे काय तर समोरचा कोणत्या फाईलमध्ये आहे हे समजून घेऊन त्याला समांतर अशी आपली फाईल आपण ओपन करायची ! वाटते तितके कठीण नाही. पण यासाठी आपल्याला सराव करायला लागेल. पहिल्यांदा समोरचा कुठल्या फाईलमध्ये बोलतो आहे हे ओळखण्याचा! आणि नंतर तर आपली रिएक्शन कोणत्या फाईलमध्ये जाते हेही ओळखण्याचा! यात निश्‍चितपणे मजा येते.

तो एक मनाला खेळ होऊन बसतो. आणि संवाद ते सुसंवाद आणि पुढे सुखसंवादाकडे आपण कसे जाऊ लागतो ते समजतही नाही. तो ‘बोनस’ असतो आपल्यासाठी! चला तर करू या हा खेळ आजपासून सुरू ! तुमचे अनुभव कळवत राहा.

ह्या बातम्या पण वाचा : 

मानसी फडके
एम ए मानसशास्त्र,
एम. एस. समुपदेशन आणि सायको थेरपी
एम .ए. मराठी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER