“आय ॲम ओके यू आर ओके ! “( भाग १)

Mansavad

श्री समर्थांनी सांगितलेली सुखसंवाद हा सुखावह वाटत असला तर इतका सोपा ही नाही. आपण सगळी माणसे आहोत .आपल्या भावभावना, विचारांची भिन्नता, स्वभावविशेष आणि इतरही काही अडथळे या सुख संवादात येत असतात. सुखसंवादातील ‘सुख ‘केव्हा गळून जाते ते कळत नाही, आणि पुढे ‘सं ‘पण नाहीसे होऊन त्याऐवजी ‘वाद-विवाद ‘असा नवीन शब्द तयार होतो. त्याची परिणती वितंडवादात होते, किंवा कधीतरी संवादच खुंटतो! मी पण यावर खूप विचार केला? यावर उपाय काय?

“ट्रांजेक्शनल अनालिसिस” ही डॉ.एरिक बर्न. यांची थेरपी यावर खूप उपयोगी पडू शकते. म्हणूनच ती आज तुमच्याशी शेअर करते आहे. थोडीशी किचकट वाटेल पण खूप उपयोगात येणारी अशी आहे.

प्रत्येक व्यक्तीमध्ये तीन फाइल्स किंवा कप्पे असतात. हे तिन्ही सगळ्यांमध्येच असतात .पण कोणाची कोणती फाइल किंवा कप्पा तीव्र (डॉमिनंट), तर कुणाची कुठली!

चाइल्ड (C ) पॅरेण्ट (P) आणि एडल्ट (A ) या तीन कप्प्याची नावें !

आपल्या बालपणीच्या सुखद आठवणी किंवा अनुभव ही पुढच्या आयुष्यातील आपली दगदग सुसह्य करत असतात .अगदी आम्ही दोघी बहिणींनी कैऱ्या वाळवून करायला टाकलेली आंबुशी दुपार भरात कशी फस्त केली होती,शेजारची गुजराथी काकू घरात घुसलेल्या गाईला हाकलताना काय बोलायची आणि कशी चालायची! यासारख्या गोष्टी माझे आत्ताचे दोन क्षणही सुखद करतात.हे वाचताना तुम्हाला ही कुठे तुमचे बालपण आणि बालपणीच्या आठवणी आठवून तुम्ही त्यात गुंतुन जाल.

मनाच्या कॉम्प्युटरमध्ये अशा आठवणींचे ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असतात. आणि अधूनमधून ते रिप्ले ही होत असतात. बघा ह! आजीच्या हातचा कालवलेला वरण-भात! हे आठवताना आजी ,तिचा स्पर्श, गंध, तिच्या हाताची चव हे सगळ आठवतं ! जसंच्या तसं! अचानक घरात शिरताना आपल्याला भाताचा सुगंध जाणवतो..आणि आपले रेकॉर्डिंग अचानक रिप्ले होते. आणि मग आजी, तो भात, आणि सगळं काही आठवत जाते. हे रेकॉर्डिंग अगदी गर्भावस्थेपासूनच होत असतं. म्हणूनच आई आनंदी हवी या काळात !असे म्हणतात.

“गर्भाचे आवडी ,मातेचा डोहाळा!
जेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे! “असे संत तुकाराम म्हणतात.
हीच ती चाइल्ड म्हणजे (C) फाईल !

म्हणजेच पोटातल्या बाळाच्या आवडी पुरवण्यासाठी मातेचे डोहाळे पुरवायचे .गर्भाला सुखदुःख भावभावना असतात. तसे परिणाम या child फाइलवर होतात. जे पाहिलं ,ऐकलं ,अनुभवलं त्यातून घडणारी ही फाईल असली तरी चाइल्ड फाईल म्हणजे पोरकटपणा नाही. तर भावना, कुतूहल सृजनशीलता ,नवीन ज्ञान मिळवण्याची धडपड,, नवीन काही करण्याची धडपड, कला ,काव्य, सौंदर्य, नाजूकपणा यांनी भरलेली ! बालपणीच्या आठवणींची ही हळवी फाईल! वडीलधाऱ्यांचा अविर्भाव बाळ टिपत असतं आणि त्यावरून काही निष्कर्ष त्याच्या मनावर कोरले जातात.

ही फाईल’ परमनंट’ असते आणि नाजूक अशा धक्क्यानेहि ती रिप्ले होते . जसे की लहानपणी खाललेल्या भाताचा वास ! परत कुठे आला की लगेच आपल्याला अाजी, भात इ .आठवत !

आपण विमानात बसलो असलो तरी कधी तरी धावत जाऊन कधीतरी विमान बघतो. कागदाच्या बोटी पाण्यात सोडायलाहि कधीतरी आपल्याला आवडतं .पहिल्या पावसात भिजायला आवडतं. अशा प्रकारचा उत्साहा आपल्यापैकी प्रत्येकाचा अधूनमधून ‘ ऊतू. ‘ जातो . तो सगळा या फाईलचाच प्रताप !

दुसरी फाईल वा कप्पा म्हणजे पॅरेण्ट ( P) ! कशी तयार होते ही?
यावेळी मूल मोठे होऊन काय करू नि काय नको असे त्याला होते. आणि उपद्व्याप वाढत जातात. याच काळात पालकांचे हे करू नको ,तिकडे जाऊ नको ,असे करू नको ,असे सुरू होते. आणि का हे विचारायची शारीरिक व मानसिक तयारी जोपर्यंत होत नाही तोपर्यंतच्या सगळ्या नोंदी या फाईलमध्ये होत राहतात. त्यात काही सुसंस्कार व कुसंस्कारही होतात. कधी त्यांचं कौतुक केलं जातं तर कधी आपण त्यांना रागवतो .आपल्या या मूड्स मधला बदल आणि त्याबद्दलचा कार्यकारणभाव त्यांना समजत नाही. मग एकच निष्कर्ष निघतो !” मी O.K. नाही !”

आणि दुःख ,असहाय्यता, निराशेच्या भावना मनात रुजत राहतात. आणि ही ‘अन एडिटेड ‘ फाइल्स चा गजर सारखा परत परत वाजत राहतो!

डॉक्टर ‘टूच ‘करतात !असे सांगून सेवा करणाऱ्या व्यक्तीला अापण खलनायक बनवतो. समर्थांनी उत्तम पुरुष लक्षणे सांगितली ती सगळी म्हणजे हीच फाईल!

माझी आई नेहमी मी मला गवत काट्याकुट्यांत जाताना “चप्पल घालून जा ,किडेकीटकुल ,विंचूकाटा असतो” असं म्हणायची. याचा माझ्या मनावर इतका ठसा आहे की ,मला सापाची प्रचंड भीती वाटते. “पावसाळा- किडा किटकुल – साप” हे कॉम्बिनेशन माझ्या मनावर पक्के ठसले आहे.

क्रूर पालकांच्या मुलांवर, किंवा ज्यांना लहानपणी प्रेम मिळालं नाही अशा मुलांची ही फाईल कशी बनत असेल ?
आता विचार करू तिसरी फाईल( Adult ) प्रौढ! ती (A ) अशी आपण ओळखणार आहोत. वरच्या दोन्ही फाइल्स मुलाच्या वयाच्या शाळेत जाई पर्यंत पूर्ण झालेल्या असतात. पण निराश व्हायचं कारण नसतं, की आपल्या व्यक्तिमत्त्वाची घडण तर केव्हाच घडून गेलेली आहे. आता काय उपयोग?

A फाइल्स रेकॉर्डिंग हे विचारपूर्वक ठरवलेल्या गोष्टींचे आणि निर्णयांचे असते.

पी फाईल मधील सूचना योग्य हेतुने पण मोठेपणी अडचणीत टाकणाऱ्या असतील ,तर त्या बदलून A मध्ये टाकले नाहीत तर अनर्थ होऊ शकतो .म्हणजे उदाहरणार्थ माझ्या पॅरेण्ट फाईल मधून मला विंचू काट्या पासून जपण्यासाठी सूचना होत्या. पण त्यामुळे जर पावसाळ्यात खाली गाद्या घालून झोपायची वेळ आली अन् मी घाबरून गेले तर ते योग्य नाही .ती ॲडजस्टमेंट ,तो बदल मला करायचा ,तर P फाईल बदलून A फाईल मध्ये तो अनुभव मला टाकावा लागेल.

गीतेमध्ये ज्यावेळी अर्जुनाला नैराश्य येतं की समोर माझे नातलग आहेत. त्यांना तसे मारू? हा त्याच्या मनातला विचार ही P / पॅरेण्ट फाईल, ( असं करू नये, सगळ्यांशी चांगले वागावे) . पण त्यानंतर मात्र गीतेत सर्वत्र एडल्ट A फाईल दिसते. भगवान श्रीकृष्ण सर्वात मोठा मानसशास्त्रज्ञ म्हणता येईल, ज्यांनी अर्जुनाला P /पॅरेण्ट फाईल मधून बाहेर काढले.

थोडक्यात पुढील आयुष्यात आपण जेव्हा जेव्हा काही वागतो ,बोलतो तेव्हा मेंदूकडून सुचना मिळत असतात .या सूचना विविध फाइल्स कडून (C/ P / A)आपल्याला मिळतात. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात या तिन्ही फाइल्स असून प्रत्येकाची कुठलीतरी एक फाईल strong असते.

त्यानुसार प्रत्येकाची स्वतः विषयीची आणि इतरांसंबंधी ची भावना पक्की होते.

आणि कुणाचे कुणाशी संभाषण सुसंवादाचे होईल तेही ठरते. ते बघूया उद्याच्या भागांमध्ये!

तोपर्यंत तुम्हीपण शोधा ,तुमची कोणती फाइल जास्त स्ट्रॉंग आहे ती ? तुमचा अनुभव कळवा आणि अडचणीही !

मानसी फडके
एम ए मानसशास्त्र,
एम. एस. समुपदेशन आणि सायको थेरपी
एम .ए. मराठी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER