लॉकडाऊनमध्येही तयार होत आहेत अवैध झोपडपट्ट्या; ‘मनसे’ने पुढे आणले वास्तव

Slum Area - MNS

मुंबई : देशभरात कोरोनाचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली . या काळात ठिकठिकाणी असलेले परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतले आहे. मुंबईतही लाखो मजूर वास्तव्यास होते. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये हे मजूर राहात होते आणि आपली उपजीविका करत होते. मुंबईतल्या अशाच झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अस्वच्छता, अतिशय दाटीवाटीतली वस्ती आणि सगळ्याच सुविधांचा अभाव यामुळे अशा भागांमध्ये कुठलाही रोग सगळ्यात आधी पसरतो. मात्र लाखो मजुरांच्या स्थलांतरानंतरही मुंबईला लागलेला बेकायदा झोपडपट्ट्यांचा आजार काही कमी झालेला नाही.

अजूनही बेकायदा झोपडपट्ट्यांचं काम सुरूच असल्याचं वास्तव मनसेनं उघड केलं आहे. मुंबई आता आणखी बेकायदा वस्त्यांचं ओझं पेलू शकत नाही, असे मनसेनेने म्हटले आहे. मुंबईत लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत कांदळवनात मातीचा भराव टाकून त्या ठिकाणी अवैध झोपडपट्टी निर्माण करण्याचे काम सुरू आहे. विक्रोळीतल्या कन्नमवारनगर परिसरात एका रात्रीत अशा झोपड्या उभ्या राहात आहेत.

मनसेचे कामगार नेते मनोज चव्हाण यांनी अशा बेकायदा झोपडपट्टी बांधकामाचा व्हिडीओ तयार केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तर याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिकेने आतातरी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER