पहिल्या लाटेकडे केलेलं दुर्लक्ष भोवलं, आता ‘पॉझिटिव्ह’ राहावं लागेल- सरसंघचालक

Mohan Bhagwat

नवी दिल्ली : भारताला कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा तीव्र तडाखा बसला आहे. रुग्णसंख्येसोबतच दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडादेखील वाढू लागला आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेसोबतच प्रशासनासमोरदेखील मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी कोरोनाची दुसरी लाट येण्यामागे जनता आणि सरकारने केलेल्या दुर्लक्षाला जबाबदार ठरवलं आहे. मात्र, आता नागरिकांनी ‘पॉझिटिव्ह’ राहूनच या संकटाचा मुकाबला करायला हवा, असं मतही भागवत यांनी नोंदवलं.

‘पॉझिटिव्ह अनलिमिटेड’ या कार्यक्रमाला मोहन भागवत संबोधित करत होते. यावेळी भागवत म्हणाले, पहिल्या लाटेनंतर सरकार आणि जनतेने दुर्लक्ष केले होते म्हणून हे संकट उभे राहिले. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण तिला न घाबरता तिला परत फिरावं लागेल, अशी तयारी आपल्याला करायला हवी. आता आपल्याला ‘पॉझिटिव्ह’ राहावं लागेल. स्वत: कोविड निगेटिव्ह ठेवण्यासाठी सावधान राहावं लागणार आहे. तसेच सध्याची परिस्थिती पाहता तर्कहीन वक्तव्येही टाळावी लागणार आहेत. ही परीक्षेची वेळ आहे. मात्र, सर्वांना एकजूट राहावे लागेल. एक टीम म्हणून काम करावे लागेल, असं भागवत यांनी सांगितलं.

कोरोना हे मानवतेवरील संकट आहे. आपल्याला या संकटाचा सामना करून जगासमोर उदाहरण निर्माण करायचं आहे. एकमेकांचे गुणदोष काढण्यापेक्षा एक टीम म्हणून काम केलं पाहिजे. गुणदोष काढण्याचं काम नंतरही करता येईल. मात्र, सध्या टीम म्हणून काम करत या संकटावर मात करायला हवी. जे धैर्यवान लोक असतात, ते कायम प्रयत्न सुरूच ठेवतात. आपल्यालाही तसंच करायचं आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावं लागणार आहे. एकमेकांच्या गुणदोषांची चर्चा करण्यासाठी नंतर वेळ मिळणारच आहे, असंही भागवत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button