तुम्ही मुख्यमंत्री असता तर मदत झाली असती; शेतकऱ्याला फडणवीसांसमोर अश्रू अनावर

Farmers-Devendra Fadnavis

तुळजापूर :- माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडवीस (Devendra Fadnavis) अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्यात आज आपसिंगा गावात गेले. नुकसानीची माहिती सांगताना एक शेतकरी म्हणाला – आभाळच फाटलं की ओ… तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती. शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रुंची धार लागली! हजर असलेले सर्व लोक गहिवरले.

फडणवीसांचा ताफा गावात येताच शेतकरी त्यांच्या भोवती गोळा झाले. कोणी त्यांना उद्ध्वस्त झालेल्या शेताकडे या म्हणू लागला तर कोणी जमीनदोस्त घर पाहण्याची विनंती करू लागला. काही शेतकरी नुकसानाची माहिती देऊन मदत करण्याची विनंती करू लागले. एका शेतकऱ्याला फडणवीसांशी बोलताना अश्रू अनावर झाले. आता तुम्हीच काही तरी करा. तुम्ही आज असता तर काही तरी मदत झाली असती. माझे सगले घर दूधावर चालत होते. आता जनावरच वाहू गेली. कसा जगू मी? असे म्हणून तो धायमोकलून रडायला लागला.

कधी पाहिला नव्हता असा पाऊस झाला. आमच्या घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेलीत. पिके उद्ध्वस्त झाली. कशाचा कशाचाच आधार राहिला नाही. आमच्याकडे कोणी फिरकत नाही. सायेब.. , असे शेतकरी म्हणत होते.

एक शेतकरी म्हणाला – शेतात फक्त दगडगोटे उरले आहेत. काय खावे? आता पाच वर्ष शेती ओस पडणार. जगायचे कसे ? तो ही रडू लागला. सर्व शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसव तरंगत होती. फडणवीसही गहिवरले. त्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणालेत, काळजी करू नका. मी तुमच्या सोबत आहे. फडणवीस यांनी लोकांची निवेदन घेतली. किती पंचनामे झाले, शेतमालाचे किती नुकसान झाले याची माहिती घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER