“कोरोनाला रोखायचे असेल तर…” आदर पूनावालांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आवाहन!

Adar Poonawalla - Joe Biden

पुणे :- गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला आहे. या विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसीची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवला. लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सीरम इन्स्टिट्यूटसमोर आता मोठे आव्हान उभे आहे. तसेच लसीचे उत्पादन ठप्प होण्याची भीती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भावुक आवाहन केले आहे.

याबाबत पूनावाला यांनी ट्विट केले आहे. पूनावाला यांनी अमेरिकेमधून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालावर लादलेले निर्बंध हटवण्याची विनंती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना केली आहे. आदर पूनावाला म्हणाले की, “आपल्याला खरोखरच या व्हायरसला हरवायचे असेल तर एकत्रित यायला हवे. असे झाल्यास लस उद्योगाच्यावतीने मी विनंती करतो की, अमेरिकेच्या बाहेर कच्च्या मालाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवावे. जेणेकरून लसीचे उत्पादन वाढू शकेल. या संदर्भाची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे आहे.”

सीरम इन्स्टिट्यूट  आणि अ‍ॅस्ट्राजेनेकाद्वारे ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन करत आहे. भारतामध्ये या लसीला मान्यता मिळाली होती. ही लस अनेक देशांना निर्यातही होत आहे. सीरम इन्स्टिट्यूट सर्वाधिक लसींची निर्मिती करते. हल्लीच काही राज्यांमध्ये लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचे समजले. मात्र, केंद्राने लसींचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, आदर पूनावाला यांनी यापूर्वी सांगितले होते की, कोरोना लस विकसित करण्यासाठी पुरेसा कच्चा माल उपलब्ध नाही. अमेरिकेने डिफेन्स अ‍ॅक्ट अंतर्गत लसीच्या कच्च्या मालावर बंदी घालणे म्हणजे लसीवर निर्बंध लादण्यासारखे आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ‘नोवाव्हॅक्स’ या कोरोनावरील लसीचेही उत्पादन होत आहे. मात्र, कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे हे उत्पादन बंद आहे.

“सीरम इन्स्टिट्यूट अमेरिकेकडून विविध प्रकारच्या कच्च्या मालाची आयात करते. आयत्या वेळी पुरवठादार शोधण्यास उशीर लागणार आहे. कंपनी नवा पुरवठादार शोधत आहे. सहा  महिन्यांनंतर अमेरिकेवर अवलंबून राहावे लागणार नाही. कंपनीला सध्या कच्च्या मालाची गरज आहे.” असे पूनावाला यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button