एकत्र चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्या, काँग्रेस नेत्याची मागणी

Manikrao Thackeray

यवतमाळ : ‘राज्यात शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP), काँग्रेसचे (Congress) सरकार आहे. त्यामुळे विधानसभेचं सभापतीपद हे काँग्रेसकडेच कायम आहे. त्यामध्ये दोन्ही पक्ष सहकार्य करत आहे. सर्वांना घेऊन चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे’ अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे (Manikrao Thackeray) यांनी केली आहे.

काँग्रेसच्या प्रदेशध्यक्षापदी नाना पटोले यांची निवड झाली आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा दिला आहे. पण प्रदेशाध्यपदाबरोबरच उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा सुद्धा रंगली आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. तर दुसरीकडे माणिकराव ठाकरे यांनी थेट मागणी करून खळबळ उडवून दिली.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्ष जेव्हा एकत्र आले होते, तेव्हाच उपमुख्यमंत्रिपद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्याचं ठरलं होतं. मात्र शेवटी उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला आणि सभापतीपद काँग्रेसला देण्यात आले होते, असा गौप्यस्फोट माणिकराव ठाकरे यांनी केला. समसमान कार्यक्रमावर सरकार चालत आहे आणि सर्वांना घेऊन चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे, अशी मागणी माणिकराव ठाकरे यांनी केली.

तसंच, राज्यपाल भगतसिंग कोशारी हे कुठल्या पक्षाचे अध्यक्ष असल्यासारखे कार्य करत आहेत, भाजपचे राजकारण राजभवनावरून चालत आहे. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडून भगतसिंग कोशारी यांना द्यावे, असा टोलाही माणिकराव ठाकरे यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER