भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव, काश्मीरमध्ये फडकवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

Sanjay Raut

नवी दिल्ली : मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार, असा निर्धार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘तुम्हाला जर भगवा फडकवायचा असेल तर बेळगावमध्ये फडकवा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये फडकवा’ असा खोचक टोला राऊत यांनी भाजपला लगावला.

टीव्ही-९ मराठीशी बोलताना राऊत म्हणाले की, भाजपवाल्यांनी जर इतिहास चाळला तर त्यांना माहिती पडेल भगवा कोणाचा आहे. आमचा भगवा शुद्ध आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेला आमच्या भगव्याची संपूर्ण माहिती आहे. कोणीही आमच्या भगव्याविषयी बोलू नये. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा आहे. हात लावाल तर राख व्हाल, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.

तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर तो बेळगावमध्ये फडकवा. भगवा फडकवायचा असेल तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये फडकवा. आमचं हिंदुत्वसुद्धा आहे. कोणी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. वेळ आल्यास आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका मांडू. मेहबूबा मुफ्तींसोबत सरकार स्थापन करणाऱ्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

विजेमध्ये झालेला तोटा हा भाजपाच्या सरकारच्या कार्यकाळातील आहे. तो त्यांनी वसूल करून द्यावा. त्यानंतर भाजपाने आरोप करावा, असंही राऊतांनी सुनावलं. महाराष्ट्रामध्ये कोरोना नियंत्रणात आहे. दिल्लीसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकार सजग आहे, अशी ग्वाही संजय राऊत यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER