‘दूरदर्शन’वरील संस्कृत बातम्या नको असतील तर टीव्ही बंद करा!

  • आक्षप याचिकेतस मद्रास हायकोर्टाचे उत्तर

चेन्नई : ‘दूरदर्शन’ (Doordarshan) वरून प्रसारित केल्या जाणाºया संस्कृत (Sanskrit) बातम्या याचिकाकर्त्यास ऐकायच्या नसतील तर तेवढा वेळ टीव्ही बंद करण्याचा पर्याय त्यांना उपलब्ध आहे, असे उपरोधिक भाष्य करत या बातम्यांना आक्षेप घेणारी एक जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) फेटाळली.

संस्कृत ही भारतात बाहेरून आलेल्या आर्यांची भाषा आहे असे मानून दक्षिणेकडील द्राविडी संस्कृतीचे अभिमानी या भाषेला विरोध करत असतात. ‘दूरदर्शन’च्या राष्ट्रीय वाहिनीवर दिवसातून एकदा प्रक्षेपित केले जाणारे १५ मिनिटांचे संस्कृत बातमीपत्र ‘पोधगाई तमिळ’ वाहिनीवरही प्रसारित केले जाते. ते बंद करावे यासाठी एस. मुथुकुमार यांनी याचिका केली होती. संविधानाच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या सर्व भाषांच्या विकासासाठी सारखा निधी खर्च करण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा, अशीही त्यांनी मागणी होती.

मुख्य न्यायाधीश न्या. संजीव बॅनर्जी  व न्या. एम. एम. सुंदरेश यांनी ही याचिका फेटाळताना म्हटले की, एक तर ‘दूरदर्शन’चे कार्यक्रम फारच थोडे लोक पाहतात. दुसरे असे की, हा विषय पूर्णपणे सरकारच्या अखत्यारितील आहे. आणि तिसरे म्हणजे, दिवसभराच्या कार्यक्रमांच्या एकूण वेळेच्या तुलनेत संस्कृत बातम्यांची वेळ अगदीच नगण्य आहे. तरीसुद्धा याचिकाकर्त्यास या संस्कृत बातम्या आवडत नसतील किंवा त्या काही उपयोगाच्या नाहीत असे त्यांना वाटत असेल तर त्या पाहण्याची सक्ती त्यांच्यावर कोणीही केलेली नाही. संस्कृत बातम्यांच्या वेळेला ते एक तर टीव्ही बंद करू शकतात किंवा मनोरंजनासाठी दुसरे काही तरी पाहू शकतात.

खंडपीठाने असेही म्हटले की, ज्यांच्याकडे अधिक प्रकर्षाने लक्ष द्यायला हवे, असे इतरही अनेक खूप महत्वाचे सामाजिक प्रश्न आहेत. त्यामुळे अशा क्षुल्लक गोष्टीवर वेळ घालवावा, असे न्यायालयात वाटत नाही. याचिकाकर्त्यास खरंच समाजहिताची कळकळ असेल तर त्यांनी दुसरे कुठले तरी याहून महत्वाचे विषय न्यायालयापुढे जरूर मांडावेत.

आम्ही याचिका नाकारली असली तरी सरकार दरबारी जे कोणी ऐकायला तयार असतील त्यांंच्याकडे याचिकाकर्ते त्यांचे गाºहाणे मांडू शकतात, अशी मुभाही दिली गेली.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER