राजेशाही असती तर केव्हाच दुष्काळावर निर्णय घेऊ शकलो असतो – उदयनराजे

सोलापूर : पावसाची आशा, दिलासा देणारा जून महिना सुरू होऊन १३ दिवस होऊन गेले; परंतु राज्यात अद्यापही मान्सून मात्र लपूनच बसलेला आहे. पाण्याअभावी राज्याला मोठा दुष्काळ पाहावा लागत आहे. राज्याला दुष्काळातून सावरण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठलाकडे दुष्काळ निवारणाचे साकडे घालण्यासाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले गेले आहेत. उदयनराजे भोसले यांनी दुष्काळावर बोलताना जनतेलाच दुष्काळावर निर्णय घेण्यास सांगितले आहे.

“लोकशाही आहे, तुम्ही राजे आहात. त्यामुळे दुष्काळावर तुम्हीच निर्णय घ्या. राजेशाही असली असती, तर मी कधीच दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन रिकामा झालो असतो.” असं उदयनराजेंनी पत्रकारांजवळ म्हटलं. पाण्यावरून होत असलेल्या राजकारणावर पत्रकारांनी उदयनराजेंना प्रश्न केला असता, “कोणताही प्रकल्प होताना ज्या-त्या तालुक्याला पाणी आरक्षित ठेवले जाते. हे आरक्षित पाणी ज्या-त्या तालुक्याला मिळावे हीच लोकांची मागणी होती.

मी कुठलेही राजकारण करण्यासाठी बसलेलो नाही. मला जनतेची सेवा करायची आहे.” असे म्हटले. दरम्यान, राज्यात सध्या बारामती विरुद्ध पाण्याचा प्रश्न पेटला आहे.