उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आनंदच होणार – नीलम गोऱ्हे

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे झाले तर आम्हाला आनंद होईल असं मत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.

आषाढी एकादशी निमित्त नीलम गोऱ्हे यांनी पंढरपूर येथील पांडुरंगाचे दर्शन घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल यावर उद्धव ठाकरे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होऊन निर्णय होईल. शिवसेनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वच घटकांचे प्रश्‍न सोडविण्यात शिवसेना आग्रही राहिली आहे.

त्यामुळे शिवसेनेला सत्तेत समान वाटा मिळावा ही सर्वांचीच इच्छा असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसेना कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसेच राजकारणापासून उदासीन असलेला युवक आदित्य ठाकरे यांच्या कार्याकडे आकर्षित होऊन येत आहे. आदित्य यांच्यामध्ये असलेल्या गुणांची ती चुणूकच आहे. त्यामुळे युवकांना राजकारणात प्रेरणा मिळावी यासाठी आदित्य ठाकरे हे विधानसभेत आले तर एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल. असही नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या विधवा पत्नीचा पुनर्वसन करण्यासाठी लवकरच विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आला आहे. राज्यातील महिलांच्या सार्वजनिक शौचालयासाठी आपला प्रयत्न असणार आहे. शिवसेनेने मला विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची संधी दिली असून तब्बल ५५ वर्षांनंतर त्या ठिकाणी महिलेला संधी मिळाली आहे. आजवर पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली. मिळालेल्या पदांपेक्षा ‘मातोश्री च नातं’ हे पद माझ्यासाठी खूप मोठं आहे. असंही ही त्या यावेळी म्हणाल्या.

पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश कोठे, पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, प्रताप चव्हाण, नगरसेवक गणेश वानकर, अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते.