वेळ पडल्यास प्रकाश आंबेडकरांसाठी एक पाऊल मागे घेऊ ! – राजेंद्र गवई

Prakash Ambedkar-Rajendra Gavai

महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आघाडीत सामील व्हावे. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर जागावाटपासंदर्भात आपण एक पाऊल मागे घेऊ, असे स्पष्टीकरण रिपाइंचे (गवई गट) राज्य सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी सोलापुरात दिले.


सोलापूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज्यात होणारी विधानसभा निवडणूक कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी अवघड जाणार हे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा सर्वाधिक फायदा भाजपलाच झाल्याचे दिसून आले. वंचित बहुजन आघाडीला आघाडीसोबत घेण्याची गरज होती परंतु, लोकसभा निवडणुकीपूर्वीचा अतिविश्‍वास आघाडीला महागात पडला. त्यामुळे आता आघाडीतील नेत्यांनी वंचित बहूजन आघाडीला सोबत घ्यावे. जेणेकरुन भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे सोपे पडेल. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास आपण जागा वाटपात एक पाऊल मागे घेऊ, असे गवई यांनी स्पष्ट केले.

हि बातमी पण वाचा : “काँग्रेस सोबत आघाडी करण्याची चर्चा केवळ केंद्रिय नेतृत्वासोबतच करू.” – प्रकाश आंबेडकर

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व दर्यापूर या दोन विधानसभा मतदारसंघांसह सोलापुरातील मोहोळ अथवा दक्षिण सोलापूरच्या जागेसह एकूण दहा जागा रिपाइंला (गवई गट) द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे केली. तसेच आमच्या मागणीचा सन्मानपूर्वक विचार न केल्यास राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघात आम्ही आमचे उमेदवार उतरवू, असा इशारा गवई यांनी दिला. दरम्यान, याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जागांबाबत बैठक झाली असून आघाडीच्या निणर्याची प्रतीक्षा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हि बातमी पण वाचा : वेध विधानसभेचे; मल्लिकार्जुन खरगे शरद पवारांच्या भेटीला !

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील भाजप सरकारविरोधात वातावरण निर्माण झाले होते. तरीही त्यांना बहुमत मिळाले. या पार्श्‍वभूमीवर ईव्हीएमवर नुसती शंका उपस्थित करण्यापेक्षा सर्व राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरण्याची गरज आहे. कोणत्याही एका लहान पक्षाने अथवा गटाने तशी मागणी करुन चालणार नाही. असेही ते म्हणाले.

हि बातमी पण वाचा : ‘वंचित’मुळे सांगलीतील पाच मतदारसंघात आघाडी, युतीत चिंतेचे वातावरण !