
औरंगाबाद : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हा शिवसेनेचा (Shivsena) मुद्दा आहे. आता सत्ता आहे तर शिवसेनेने हे नामांतर करून टाकले पाहिजे. या मुद्द्यावर हिंदू-मुस्लिम दरी निर्माण करण्याची गरज नाही, असा टोमणा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी शिवसेनेला मारला.
शनिवारी तापडिया नाट्य मंदिरात शिवसंग्रामच्या वर्धापनदिन मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणालेत, शिवसेनेने औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा हाती घेतलेला आहे. आता त्यांची सत्ता आहे तर नामांतर करून टाकले पाहिजे. या मुद्द्यावर हिंदू-मुस्लिम दरी निर्माण करण्याची गरज नाही. यापूर्वीच्या विद्यापीठ नामांतराच्या जखमा ताज्या आहेत याची आठवण त्यांनी करून दिली.
मराठा आरक्षण प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, अशोकराव चव्हाण हे अनेक गोष्टींची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देत नाहीत. आता हे मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीस त्यांनी चव्हाण यांना बोलावलेही नव्हते. ते बाजूच्या खोलीत बसून राहिले आणि मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटे यांना सुनावले, अशा बातम्या पेरत राहिले.
इतर समाजाच्या आरक्षणाची लढाईही पूर्ण ताकदीने लढू. आगामी काळात शिवसंग्राम पक्ष मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम व ब्राह्मण आरक्षणाची लढाई तेवढ्याच ताकदीने लढणार आहे. मार्चमध्ये विधानसभा अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा मेटे यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला