आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे कधी थांबणार? – फडणवीस

Devendra Fadnavis

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर उद्या आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व बडनेराचे आमदार रवी राणा यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. विचारले, ”आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा? लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का?”

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, म्हणून आंदोलन केले तर कारागृहात डांबले. शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन ‘मातोश्री‘वर भेटण्यासाठी रेल्वेने निघाले, तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अमरावतीत पुन्हा स्थानबद्ध! २५-५० हजार हेक्टरी मदतीच्या गप्पा करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का? असा प्रश्न फडणवीस यांनी ट्विटद्वारे केला आहे.

निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली असती, त्यांचे दुःख समजून घेतले असते, तर किमान आपले म्हणणे ऐकून घेतल्याचे समाधान तरी शेतकऱ्यांना मिळाले असते. आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा?

या आधी देखील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकावर टीका केली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

जेलभरो आंदोलन करणाऱ्या आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केल्याचा निषेधही फडणवीस यांना नोंदवला होता. ”शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो.” असे फडणवीस म्हणाले होते.

”बळिराजा संकटात असताना त्याची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी सरकारकडे मागण्या करण्यात आल्या, सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पण सरकार दाद द्यायलाच तयार नाही. बळिराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना भाजपाने अनेक ठिकाणी बेसन-भाकर आंदोलन केले.”दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना बळिराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी या सरकारने अंधारातच ठेवली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. बोंडअळीने कपाशी संपविली. मराठवाडा, विदर्भ आणि इतरही सर्व भागात हीच अवस्था! पण मदत द्यायला सरकार तयार नाही.” असे फडणवीस म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER