
मुंबई : दोन दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi, ) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन चांगलाच वाद पेटला आहे . यावेळी सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर दिलेल्या भाषणात मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचे म्हटले होते.
आता मोदींच्या या दाव्यावरुन भाजपा समर्थक आणि विरोधक अशी टीका टीप्पणी सुरु झाली आहे. याचसंदर्भात शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी(Priyanka Chaturvedi) यांनीही मोदींच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जर संपूर्ण भारत बांगलादेशची निर्मिती व्हावी या बाजूने होता तर आंदोलनाची गरज काय होती?, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केला आहे.
मोदींच्या या वक्तव्यासंदर्भात ट्विट करताना चतुर्वेदी यांनी इंदिरा गांधीचा थेट उल्लेख टाळला असला तरी १९७१ साली भारतीय पंतप्रधानांनी अनेक देशांच्या विरोधाचा सामना करत बांगलादेशला मदत केल्याचे म्हटले आहे.
१९७१ मध्ये भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेसारख्या देशाने केलेल्या विरोधाचा सामना करुनही बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून दिलं. मला प्रश्न पडला आहे की जर सर्व भारतीय एकाच मताचे होते तर सत्याग्रह करण्याची काय गरज होती आणि यासाठी कोणाला अटक का केली जाईल? मला खात्री आहे की १९७१ संदर्भात आपल्याला लवकरच नवीन माहिती मिळेल,’ असे ट्विट चतुर्वेदी यांनी केले आहे.
दरम्यान, सावर येथील भाषणामध्ये मोदींनी बांगलादेश स्वातंत्र्यासाठी केलेलं आंदोलन आणि अटकेचा उल्लेख केला. ‘मी बांगलादेशातील बंधू, भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती,’ असे देखील मोदींनी म्हटले होते.
India’s PM in 1971 despite criticism from countries like US, helped Bangladesh get its freedom from Pakistan.
Wonder what was the need for satyagrah when all Indians were on the same side&why would someone be arrested?
I am sure we will know soon, an interesting aspect to 1971.— Priyanka Chaturvedi (@priyankac19) March 26, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला