देशाची न्यायव्यवस्थाच सक्षम नसेल तर कुणीच सुरक्षित राहणार नाही : न्या. चेलमेश्वर

नागपूर : ‘सत्तेत कुणीही असले तरी तो सत्तेचा मूळ स्वभाव हा व्यक्तीला भ्रष्टाचाराकडे घेऊन जाणारा असतो. त्यामुळे नागरिकांना कुठेच न्याय मिळत नाही. त्यामुळे न्यायव्यवस्था ही सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. जर देशाची न्यायव्यवस्थाच सक्षम आणि स्वतंत्र नसेल तर या देशात कोणीही सुरक्षित राहू शकणार नाही,’ असे प्रतिपादन स‌र्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्ती चेलमेश्वर यांनी केले.

हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे अॅड. एन. एल. बेलेकर स्मृती व्याख्यानमालेंतर्गत ‘रुल ऑफ लॉ अॅण्ड रोल ऑफ बार’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर येथील सिव्हिल लाइन्स स्थित डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात न्या. चलमेश्वर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

यावेळी चेलमेश्वर म्हणाले, ‘आपल्या देशात अनेक वेळा न्यायव्यवस्थेवर नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रयत्न केले जातात. हे प्रयत्न कधी मोठ्या तर कधी छोट्या स्तरावर केले जातात. यासाठीच न्यायव्यवस्था स्वतंत्र असणे महत्वाचे आहे. इतकेच नाही तर असे प्रयत्न होत असताना बार असोसिएशनची महत्त्वाची भूमिका असते. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण हे कोणत्याही परिस्थितीत झालेच पाहिजे.’ न्यायव्यवस्था ही घटनात्मक प्रशासनाचा भाग आहे. ती अपरिहार्यपणे सरकार व कायदेमंडळाशी जुळलेली आहे. कोणत्याही व्यवस्थेचे यश त्या व्यवस्थेच्या यशस्वी अंमलबजावणीवर अवलंबून असते, असेही चेलमेश्वर यावेळी म्हणाले.

पुढे चेलमेश्वर म्हणाले, ‘आजकाल सरकारी वकिलांना फारसा अनुभव नसतो. तसेच, त्यांची मेहनत करण्याची इच्छाही मरून जाते. याचा परिणाम हा दोषारोपसिद्धीवर होतो. आज देशात फौजदारी गुन्ह्यांमध्ये दोषारोपसिद्धीचे प्रमाण फारच कमी झाले आहे. ही चिंतेची बाब आहे. सरकारी वकिलांखेरीज पोलिसांनी केलेला सदोष तपाससुद्धा त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे पोलिसांनासुद्धा योग्य ते प्रशिक्षण आणि तपासासाठी योग्य तो वेळ आणि मुभा देणे आवश्यक आहे’, असे मत यावेळी चेलमेश्वरांनी व्यक्त केले.

यावेळी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, सचिव अॅड. प्रफुल्ल खुबाळकर मंचावर उपस्थित होते. याखेरीज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती उदय ललित, मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश भूषण गवई, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर आदी मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.