सरकारने परवानगी दिली, तर नक्षलवाद्यांसोबत मध्यस्थीस तयार : अण्णा हजारे

anna hajare

नगर :- ‘नक्षलवादाचा प्रश्न बंदुकीच्या गोळ्यांनी नव्हे, तर संवादानेच सुटू शकतो. त्यामुळे सरकारने परवानगी दिली, तर या प्रश्नावर सरकार व नक्षलवादी यांच्यात मध्यस्थी करण्यास आपण तयार आहोत,’ अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. असे प्रश्न बंदुकीच्या गोळ्यांनी सुटू शकणार नाही.

ही बातमी पण वाचा : गडचिरोली नक्षली हल्ला ; 40 नक्षलवाद्यांविरोधात हत्या आणि देशद्रोहाचे गुन्हे दाखल

गडचिरोली जिल्ह्यात कुरखेड्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभूरखेडा येथे महाराष्ट्रदिनी सी-६० कमांडोंची एक जीप भूसुरूंग स्फोट करून नक्षलवाद्यांनी उडवून दिली होती. या स्फोटात एकूण १५ जवान व एक खासगी वाहन चालक ठार झाले होते. यासंबंधी हजारे म्हणाले, ‘प्रत्येकाचे प्रश्न असू शकतात. मात्र, ते सोडवून घेण्याची पद्धत योग्य हवी. बॉम्बस्फोट, गोळीबार, जाळपोळ करून, निरपराध लोकांचे जीव घेऊन प्रश्न सुटत नाहीत. हा प्रश्न बंदुकीच्या गोळीनेही सुटणार नाही. उलट तो अधिक जटील बनत जाईल. संवादाने असे प्रश्न सुटू शकतात.

संवादामुळे अनेकदा तलवारी म्यान झाल्याचा आपला इतिहास आहे. ही परंपरा आपण विसरता कामा नये. या प्रश्नाकडे मानवतावादी दृष्टीने पाहावे लागेल. जर दोन्ही बाजूंनी मान्य असेल, तर आपण नक्षलवादाच्या प्रश्नात मध्यस्थी करण्यास तयार आहोत. आपल्याकडे मोठी सत्ता नाही, आपण फकीर आहोत. मात्र, राष्ट्र आणि समाजाचे हीत हे आपले ध्येय आहे. त्यामुळेच आपण यात मध्यस्थी करण्यास तयार आहोत. सरकारनेही याच्या मुळाशी गेले पाहिजे. नेमकी काय अडचण आहे, ते समजून घेतले पाहिजे. त्याचा उपयोग प्रश्न सोडविण्यासाठी होईल. अशा घटनांचा राजकारणासाठी वापर करणे गैर आहे, हेही सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे.’

ही बातमी पण वाचा : श्रीलंकेत पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची भीती; लष्कर सतर्क