मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरू, ओबीसी समाजाचा इशारा

Maratha reservation

मुंबई :  सर्वोच्च न्यायालयाने (SC) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. त्यातच आता ओबीसी समाजानेही (OBC) आरक्षणाबाबत आक्रमक पवित्रा उचलला आहे.

“मराठा समाजाला शिक्षणात, नोकऱ्यात आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र ते आरक्षण ओबीसी आरक्षण कोट्यातून दिल्यास रस्त्यावर उतरु”, असा इशारा ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी दिला. जर लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी मूक भूमिका घेतली तर मतदानावर बहिष्कार घालू, अशी भूमिका ओबीसी संघर्ष सेनेनं मांडली आहे.

“ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण दिल्यास 52 टक्के ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी बांधव आंदोलन करतील,” असा इशारा देण्यात आला.

“मराठा समाजाच्या अनेक संघटनांतर्फे समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट करुन ओबीसींच्या आरक्षणात 5 टक्के आरक्षणाची मागणी होत आहे. त्यांची ही मागणी घटनाबाह्य आहे. तसेच ओबीसींवर अन्याय करणारी आहे. त्याबद्दलचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रशासनाकडे पाठवत आहोत,” असे प्राध्यापक हाके यांनी सांगितले.

पुणे श्रमिक पत्रकार संघात याबाबत पत्रकार परिषद झाली. यावेळी ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण हाके, बारा बलुतेदार महासंघाचे विशाल जाधव, ओबीसी संघर्ष सेनेचे रामदास सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य गुरव संघटना प्रताप गुरव, माळी महासंघ अनंता कुदळे, ओबीसी संघर्ष सेनेचे नेते सुरेश गायकवाड उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण : राज्य सरकारच्या इडब्ल्यूएस निर्णयावर तज्ज्ञाचे मत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER