लोक कोरोनामुळे मरत आहेत, तर ऑक्सिजन तुम्ही तयार करा

Oxygen - Vedanta - Supreme Court
  • सुप्रीम कोर्टाने तमिळनाडू सरकारला खडसावले

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे (Corona) रुग्ण ऑक्सिजनअभावी (Oxygen) दगावत आहेत. त्यांना ऑक्सिजन हवा आहे. त्यामुळे वंदान्त कंपनीला त्यांच्या बंद असलेल्या तुतीकोरीनजवळील स्टरलाईट कारखान्यात ऑक्सिजनचे उत्पादन करू देण्यास तुमचा विरोध असेल तर तो कारखाना तुम्ही चालवा आणि तेथे ऑक्सिजनचे उत्पादन करा, असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) तमिळनाडू सरकारला (Tamil Nadu Government) सुनावले.

देशात कोरोना रुग्णांसाठी सध्या जाणवत असलेली ऑक्सिजनची तीव्र टंचाई लक्षात घेऊन आम्हाला आमचा तमिळनाडूमधील बंद पडलेला स्टरलाईट कारखाना फक्त ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी सुरु करू द्यावा, अशी विनंती करणारा  एक तातडीचा अर्ज वेदान्त लि. या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. त्यावर सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. हा कारखाना सुरु करू दिला तर स्थानिक लोक संतापतील व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे सांगत तमिळनाडू सरकारने कंपनीच्या अर्जाला विरोध केला.  या भूमिकेला आक्षेप घेत न्यायमूर्तींनी राज्य सरकारला सांगितले की, देशात लोक ऑक्सिजन अभावी प्राण सोडत असताना तुमची ही कायदा आणि सुव्यवस्तेची सबब आम्ही ऐकून घेणार नाही. देशाला ऑक्सिजनची गरज आहे व त्याचे उत्पादन व्हायला हवे, एवढेच आम्हाला कळते. त्याचे उत्पादन वेदान्त कंपनी करते की, अन्य कोणी करते याला आमच्या दृष्टीने महत्व नाही. वेदान्त कंपनीला कारखाना चालवू देण्यास तुमचा विरोध असेल तर तो कारखाना तुम्ही ताब्यात घ्या व तेथे ऑक्सिजनचे उत्पादन करा. न्यायालयाने यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्यास तमिळनाडू सरकारला सांगून पुढील सुनावणी सोमवारी ठेवली.

तमिळनाडू सरकारचे ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन यांचे म्हणणे असे होते की, भयंकर प्रदूषण होते म्हणून स्थानिक जनतेचा या कारखान्यास तीव्र विरोध आहे. सन २०१८ मध्ये लोकांनी कारखान्याच्या विरोधात केलेल्या निदर्शनांवर पोलिसांनी केलेल्या गळीबारात १३ लोक ठार झाले होते. त्याच्या आठवणी लोकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. कारखाना ऑक्सिजन उत्पादनासाठी जरी चालू केला तरी लोक संतापतील, कायदा आणि सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण होईलाणि जिल्हा प्रशासनात परिस्थिती हाताळणे कठीण होईल.

कारखाना तमिळनाडू सरकारने चालवून ऑक्सिजनचे उत्पादन करावे या न्यायमूर्तींच्या सूचनेवर वैद्यनाथन म्हणाले की, याचे उत्तर देण्यासाठी मला राज्य सरकारशी बोलावे लागेल. पण आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा वापर करून केंद्र सरकारही हा कारखाना ताब्यात घेऊ शकते. त्यांनी ताब्यात घेतला तर राज्य सरकारचा आक्षेप असण्याचे काही कारण उरणार नाही.

तीन वर्षांपूर्वी गोळीबारात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांनी या सुनावणीत सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस म्हणाले की, तमिळनाडू सरकारने कारखाना ताब्यात घेऊन तेथे ऑक्सिजनचे उत्पादन करण्याचे काही कारण नाही. कारण त्या राज्यात गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन उपलब्ध आहे, असे तेथील अ‍ॅडव्होकेट जनरलनी गुरुवारीच एका प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयास सांगितले आहे. यावर सरन्यायाधीश त्यांना म्हणाले की, हा फक्त तमिळनाडूचा प्रश्न नाही. त्यांना नको असला तरी तेथील ऑक्सिजन गरज असलेल्या इतर राज्यांना पाठविला जाऊ शकतो.

केंद्र सकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आधी कंपनीला ऑक्सिजन उत्पादनासाठी कारखाना सुरु करू देण्यास पाठिंबा दिला होता. आता तो कारखना तमिळनाडू सकारने ताब्यात घेऊन तेथे ऑक्सिजन तयार करावा, असे न्यायालयाने सुचविल्यावर मेहता यांनी त्यालाही सहमती दर्शविली.

वेदान्त रिसोर्सेस लि. या मुख्य कंपनीच्या स्टरलाईट या उपकंपनीतर्फे चालविला जाणारा हा तांबे शुद्धिकरण कारखाना तमिळनाडूत तुतीकोरीनजवळ तुथूकोडी येथे आहे. कारखान्यातून होणाºया प्रदूषणामुळे परिसरातील जमिनी नापिक झाल्या व जलस्रोत विषारी झाले. त्यामुळे स्थानिक जनता या कारखान्याच्या विरोधात अनेक वर्षे आंदोलन करत होती. २२ मे, २०१८ रोजी झालेल्या निदर्शनांच्या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १३ निदर्शक ठार झाले होते. त्यानंतर लगेचच तमिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने व राज्य सरकारने हा कारखाना बंद करण्याचे आदेश काढले.

सरकारचा हा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाकडून रद्द करून घेण्यात कंपनीला अपयश आले. त्याविरुद्ध कंपनीने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.याच प्रलंबित अपिलात कंपनीने कारखाना सुरु करू द्यावा, यासाठी गेल्या डिसेंबर व जानेवारीत केलेले अर्ज फेटाळले गेले होते. आता कंपनीने हा तिसरा अर्ज करून फक्त ऑक्सिजन उत्पादनासाठी कारखाना सुरु करू देण्याची विनंती केली आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button