पवारसाहेब मंत्री बदलणार नाहीत तर मग एकनाथ खडसेंना मिळेल तरी काय?

Sharad Pawar & Eknath Khadse

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची हवा एक आठवड्यापासून जोरदार वाहू लागली तेव्हा त्यांच्या समर्थकांना ते राष्ट्रवादीत गेल्याबरोबर लगेच कॅबिनेट मंत्री होतील असे वाटले होते. एकतर त्यांना हे वाटले की नाथाभाऊंच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेऊन पवार (Sharad Pawar) साहेब त्यांना थेट गृहमंत्री करतील. मंत्रिमंडळातील हे क्रमांक दोनचे खाते आहे. ते राष्ट्रवादीचे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे आहे. अनिलबाबूंना प्रदेशाध्यक्ष केले जाईल आणि त्या जागी खडसे यांना मंत्री करणार असा होरा होता. तसे झाले नाही तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे खाते खडसेंना दिले जाईल आणि आव्हाड यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल, अशीही चर्चा होती.

खडसे हे शुक्रवारी दुपारी २ वाजता मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेश करणार होते पण तो कार्यक्रम दोन तासांनंतर झाला. कारण, तिकडे पवार साहेब हे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात बंदद्वार चर्चा करीत होते. सुमारे पाऊणतास ही चर्चा सुरू होती. त्यामुळे अशा बातम्या सुरू झाल्या की आव्हाड बहुतेक मंत्रिपदाचा राजीनामा देतील आणि पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातच आव्हाड यांच्या जागी खडसेंना मंत्री करण्याची घोषणा पवारसाहेब करतील आणि आव्हाड यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांच्याकडे आहे. पाटील हे जलसंपदा मंत्रीदेखील आहेत. त्यांच्याकडे मंत्रिपद कायम ठेवले जाईल आणि आव्हाड नवे प्रदेशाध्यक्ष असतील, असाही तर्क दिला गेला. खडसे यांच्या समर्थकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती.

पवारसाहेबांच्याच गाडीत बसून आव्हाड राष्ट्रवादी कार्यालयात पोहोचले. त्यामुळे तर आता आव्हाडांचे मंत्रिपद खडसेंना देणार व आव्हाडांना प्रदेशाध्यक्ष करणार या चर्चेला अधिकच उधाण आले पण झाले भलतेच. खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘खडसे हे कोणत्याही अपेक्षेशिवाय राष्ट्रवादीत येत आहेत’ असे जाहीर केले. स्वत: शरद पवार यांनीही, राष्ट्रवादीचे सर्व मंत्री कायम राहतील, असे सांगत खडसेंना लगेच मंत्री केले जाईल या दाव्यातील हवा पार काढून टाकली. त्यामुळे आता खडसेंच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की राष्ट्रवादीत त्यांना काय मिळेल? पवार साहेबांच्या विधानानंतर त्यांच्या मनात ही शंकेची पालही चुकचुकली आहे की, खडसे साहेबांना काही मिळेल की नाही? की नुसताच त्यांचा वापर करून घेतला जाईल. बरं पवार साहेबांबद्दल एक नेहमीच म्हटले जाते की पवार साहेब जे बोलतात त्याच्या अगदी उलट करतात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये बदल केला जाणार नाही असे पवार म्हणतात म्हणजे बदल नक्कीच होणार असे खडसे समर्थकांनी स्वत:चे समाधान नक्कीच करून घेतले असेल. खडसेंना नक्कीच काही ना काही दिले जाईल. त्यांना रिकामे ठेवणे राष्ट्रवादीला परवडणारे नक्कीच नाही. भाजपमध्ये ते रिकामे होते तर काय काय करीत होते? अगदी स्वत:च्या पक्षातील नेत्यांनाही (देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील) त्यांनी सोडले नव्हते.

आता नवीन माहिती अशी समोर येत आहे की खडसे यांना उत्पादन शुल्क आणि कामगार हे दोन विभाग दिले जातील. सध्या या दोन्ही खात्यांचे मंत्री दिलिप वळसे पाटील हे आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून वगळून खडसेंना त्यांच्या जागी मंत्री करणार अशी खात्रीलायक माहिती आहे. वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत आणि निकटस्थ मानले जातात. त्यांना मंत्रीपदावरून हटविले आणि प्रदेशाध्यक्ष केले नाही तरी ते नाराजी व्यक्त करणार नाहीत किंवा त्यांचे उपद्रव मूल्यदेखील काहीच नाही. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद काढून घेणे सर्वात सोपे असल्याचे म्हटले जाते.  हे लगेच होणार नाही. कारण, आधी खडसेंना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर पाठविले जाईल. एकूण १२ जणांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर पाठवायचे आहे. ती वाट सोपी नाही. राज्यपाल कोणती नावे मंजूर करतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात राष्ट्रवादीकडून खडसेंचे नाव राहील. लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे १२ नावे राज्यपालांकडे पाठविली जातील. राज्यपालांच्या मंजुरीची वाट न पाहता खडसे यांना मंत्रिपदाची शपथ द्यायची आणि त्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना विधान परिषदेवर पाठवायचे हादेखील पर्याय आहे.

खडसे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाचा कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीच्या आढाव्याची बैठक घेऊन १० हजार कोटी रुपयांचे पॅकेजही जाहीर करून टाकले. त्यामुळे चॅनेलवर खडसे एके खडसे चालले होते त्याला ब्रेक बसला. आपण बैठक नंतर घेऊ  असा निरोप राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना पाठविला गेला होता म्हणतात पण मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन पॅकेज दणक्यात जाहीर करून टाकले. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे शिवसेनेकडून स्वागत वगैरे अद्याप झालेले नाही. या प्रवेशाबद्दल आपण दसरा मेळाव्यातच काय ते बोलू, असे मुख्यमंत्री म्हणाले.खडसेंची जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला नेहमीच अडचण राहिली आहे. सुरेशदादा जैन,मंत्री गुलाबराव पाटील या शिवसेना नेत्यांचे राजकारण नेहमीच खडसेंच्या विरोधात राहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER