पवारांनी मदत केली नसती तर कायमचा घरी बसलो असतो – एकनाथ खडसे

Sharad Pawar-Eknath Khadse

जळगाव : भाजपामध्ये सामूहिक नेतृत्व आहे. असं असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासारखी प्रवृत्ती घुसली. हम करे सो कायदा हे धोरण त्यांनी राबवलं. मी रोहिणी खडसेंसाठी तिकीट मागितलं नव्हतं. विधानसभेच्या वेळेला ही खेळी करण्याची गरज नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर अन्याय केला, असंही एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलं आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो; कारण त्यांनी माझं राजकीय पुनर्वसन केलं. पवारांनी मदत केली नसती तर कायमचा घरी बसलो असतो. त्यांच्यामुळेच मला राजकारणात सक्रिय होण्याची संधी मिळाली, असंही एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच जळगावात आले. त्यानंतर आज ते पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांच्यासह मुक्ताईनगरात पोहचले. यावेळी त्यांचं ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं.  त्यांनी समर्थकांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, मी चाळीस वर्षे पक्षात होतो.  त्यामुळे पक्ष बदलण्याचा विचार नव्हता. मला विनाकारण मंत्रिपदावरून हटवण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने माझे तिकीट कापल्यानंतर मला राष्ट्रवादीने दोन दिवस विनंती केली होती की, तुम्ही पक्षांतर करा, आम्ही तुम्हाला तिकीट देतो.

मात्र त्यावेळी मी ती ऑफर नाकारली, असंही खडसेंनी सांगितलं. मी भाजपमध्ये थांबलो असतो तर माझं नुकसान झालं नसतं. पण आपल्या परिसराचा विकास झाला नसता. गेल्या पाच वर्षांत आपलं सरकार असतानाही आपल्या भागाला काहीच मिळालं नाही, असं सांगतानाच कार्यकर्त्यांचा दबाव होता. त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडलो. प्रसारमाध्यमांचा सर्व्हेही मी पक्ष सोडावा असं सांगत होता.

याचा अर्थ कार्यकर्त्यांमध्ये चीड होती हेच सिद्ध होतं; शिवाय नाथाभाऊ तुम्ही भाजप का सोडत नाही? तुमचं काही अडलं आहे का? असा सवालही मला कार्यकर्ते करत होते. त्यामुळे अखेर मी पक्ष सोडला, असं ते म्हणाले. भाजपने माझ्यावर अन्याय केला. मी भाजपला सोडचिठ्ठी द्यावी ही कार्यकर्त्यांची भावना होती. मी भाजपला सोडल्यानंतर त्यांना आनंद झाला. त्याचाच उत्सव आज दिसत आहे. आज खऱ्या अर्थानं  माझं सीमोल्लंघन झालं आहे, असं सांगतानाच माझा भाजपला विरोध नाही. भाजपमधील वाईट प्रवृत्तीविरोधात मी लढा दिला, अशी टीका त्यांनी फडणवीसांवर केली.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांनी जपले सच्च्या कार्यकर्त्यासोबतचे नाते, सोपवली मोठी जबाबदारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER