पवार एनडीएत मंत्री झाल्यास त्याचा फायदा देश आणि राज्याला होईल – रामदास आठवले

Sharad Pawar-Ramdas athawale

मुंबई : देशात सध्या कोरोना विषाणूचं संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने देशाच्या भवितव्याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. शरद पवार हे नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अनेक भूमिकांना नेहमीच पाठिंबा देत आलेले आहेत. राज्यात शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादीचा काहीच फायदा झाला नाही. शरद पवार हे एनडीएसोबतच हवे होते. ते जर केंद्रीय मंत्रिमंडळात आले तर त्यांचा अनुभव देशाच्या हितासाठी महत्त्वाचा ठरेल.

देशाच्या फायद्यासाठी, महाराष्ट्राच्या फायद्यासाठी शरद पवारांनी एनडीएसोबत आलं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी म्हटले आहे. राज्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जर स्वतंत्र लढला असता तर आज तो सत्तेत असता. त्या निवडणुकीत भाजपने कमीत कमी १४० जागा काबीज केल्या असत्या. सत्तास्थापनेसाठी आम्हाला जागा कमी पडल्या असत्या तर आम्ही शरद पवार यांनाच विनंती केली असती आणि त्यांना सत्तेत सहभागी करून घेतलं असतं, असेही आठवले म्हणाले. राज्यात ठाकरे सरकारने कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले; मात्र, ते अपयशी ठरलेले आहेत. राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

‘सामना’ पेपर चालवणं हे सोपं काम आहे. मात्र, कोरोनाचा सामना करणे हे सोपे काम नाही, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळे कोरोनावर उपाययोजना करण्यात सरकार कमी पडलेलं आहे. आज जर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असतं तर स्वतः ते रस्त्यावर उतरले असते. सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात तल्लीन आहेत. अशाने या परिस्थितीवर नियंत्रण कसे आणणार? ठाकरे सरकारला कोरोनावर मात करायला अपयश आले असल्याची टीका आठवले यांनी केली. राज्यात शिवसेनेच्या दबावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस काम करत असून, त्याच्या दबावाला बळी न पडता राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढायला हवा. राज्यासाठी अनेक निर्णय राष्ट्रवादीला घेता येत नाहीत. या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व दिसून येत आहे.

राज्यात जरी तीन पक्षांचे सरकार असले तरी ही सेना इतर पक्षांचे ऐकत नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाठिंबा काढून घेतला पाहिजे आणि देशाच्या भल्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायला हवा. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या भवितव्यासाठी शरद पवार यांनी शिवसेनेसोबत राहू नये, असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER