माझी मुलाखत पूर्ण वाचली असती तर…. – डॉमिनिक थिएम

Dominic Thiem

खालच्या क्रमांकाच्या टेनिसपटूंसाठी कोरोना मदतनिधीबाबत आपली मुलाखत पूर्ण न वाचताच आणि आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजून न घेताच आपल्यावर टीका करण्यात आली असे ऑस्ट्रियाचा टेनिसपटू डॉमिनिक थिएमने म्हटले आहे. केवळ सनसनाटी मथळ्यांसाठी आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावून बातम्या देण्यात आल्या असे जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या या खेळाडूने म्हटले आहे.

टेनिसमधील आघाडीचे खेळाडू, एटीपीसारखी नियंत्रण संस्था आणि विविध स्पर्धा आयोजकांच्या योगदानातून हा मदतनिधी उभारण्याची आणि क्रमवारीतील 250 ते 700 क्रमांकाच्या खेळाडूंना प्रत्येकी 10 हजार डॉलर मदत देण्याची ही योजना होती मात्र थिएमचा या योजनेत योगदान देण्यास विरोध असल्याचे आणि त्यापेक्षा त्याला जे खरोखरच गरजू वाटतील त्यांनाच मदत करण्याची त्याची भूमिका असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. यानंतर अल्जेरियन महिला टेनिसपटू इनेस इब्बू हिने एका भावस्पर्शी व्हिडिओ संदेशाद्वारे त्याचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर आता थिएमचीही प्रतिक्रिया आली आहे.

तो म्हणतो की, लोकांनी माझी ती मुलाखत पूर्ण वाचली असती तर एवढा विषय झालाच नसता. माझ्यामते टेनिसपटूंपेक्षा काही व्यक्ती व संस्थांना मदतीची अधिक गरज आहे. मी कुणाला मदत करायची हे कुणी माझ्यावर थोपवू नये तर मला ज्याला वाटेल त्याला मला मदत करू द्या असे मी म्हणालो होतो.

ऑस्ट्रियात काही उगवत्या खेळाडूंना मी आधीच मदत करतोय. मी माझी प्रतिमा सुधारण्यासाठी हे सांगत नाही तर खरोखरच त्यांना गरज आहे,आणि ते मदत करण्यालायक आहेत. आपण पाहिलेल्या काही खेळाडूंवरुन खालच्या क्रमांकाचे खेळाडू खेळाप्रती पुरेसे गंभीर नाहीत असे आपण म्हणालो होतो. सरसकट सर्वांसाठी आपले ते मत नव्हते. टेनिसमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही पूर्णपणे झोकून द्यायला हवे. माझ्या सुरुवातीच्या काळात मी अडीच वर्षे फ्युचर्स स्पर्धांत खेळलो. काही खेळाडू अजूनही असे आहेत जे सात ते आठ वर्षांपासून खेळत आहेत त्यांच्यात अजूनही व्यावसायिकता नाही. सर्वच तसे नाहीत, फक्त काहीजण आहेत. म्हणून कुणाला मदत करायची ते मला ठरवू द्या असे त्याने म्हटले आहे.

चॅलेंजर स्पर्धांमध्ये बक्षिसांची विभागणीसुध्दा अधिक चांगल्याप्रकारे व्हायला हवी असे त्याला वाटते. चॅलेंजर स्पर्धांचा दर्जा बराच चांगला असतो. त्याचे बरेच टप्पे असतात आणि ते जिंकणे फार कठीण असते. या स्पर्धांच्या खेळाडूंना अधिक रक्कम मिळायला हवी. चॅलेंजर स्पर्धेला एखादा खेळाडू प्रशिक्षक व फिजियोसह जात असेल तर त्याला अंतिम फेरी गाठली तरच पैसे मिळतात हे बदलायला हवे, असे थिएमने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला