खडसे राष्ट्रवादीत गेले तर कोणत्या क्रमांकाचे नेते असतील?

Politicians

शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सुनील तटकरे (Sunil Tatkare),दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil),अनिल देशमुख (Anil Deshmukh),धनंजय मुंडे (Dhananjay Munde), नवाब मलिक (Nawab malik), जितेंद्रआव्हाड (Jitendra Awhad) अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी उतरंड आहे.त्यात आणखी नवाब मलिकांपासून रामराजे निंबाळकरांपर्यंतची नावे जोडता येतील. आता चर्चा अशी आहे की, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. खडसे समजा तिकडे गेले तर त्यांचा क्रमांक वर दिलेल्या नेत्यांच्या नंतरचाच असेल; कारण हे सगळे पक्षाचे निष्ठांवत शिलेदार, संस्थापकांपैकी आहेत. त्यामुळे खडसेंना राष्ट्रवादीत पहिल्या पाचच काय, पण दहातही जागा मिळण्याची शक्यता नाही.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ते क्रमांक दोनचे नेते होते. महसूल, सार्वजनिक बांधकामपासून अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. मात्र, पुण्यातील एका जमीन प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून खडसे यांचे पक्षातील स्थान घसरत गेले. त्यातच त्यांनी अलीकडेच काही महिन्यांमध्ये विशेषत: लॉकडाऊनच्या काळात स्वत:ला अनलॉक करत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. फडणवीस यांच्यावर ते सातत्याने टीका करताहेत. पक्षाने त्यांना ना राज्यसभेवर पाठविले ना विधानपरिषदेवर. राष्ट्रीय कार्यकारिणीवरही त्यांची वर्णी लागली नाही.

राज्यातील भाजप नेतृत्वाविरुद्ध विशेषत: फडणवीस यांच्याविरुद्ध बोलाल आणि वरून पक्षात मानाचे स्थान मिळावे अशी अपेक्षा कराल तर ती तुम्ही चूक करताय. बंडाची भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी खडसे यांना दिला आहे. त्यामुळेच खडसे पक्षात एकटे पडल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीत गेल्याने खडसेंना फार तर आमदारकी मिळेल; पण जेवढे मिळेल त्यापेक्षा कितीतरी जास्त ते गमावतील. भाजपमध्ये त्यांना एकेकाळी असलेला मानसन्मान, आदर त्यांना राष्ट्रवादीत मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. राष्ट्रवादी हा मराठा प्राबल्य असलेला पक्ष आहे. त्या पक्षात ओबीसी नेत्यांना फार महत्त्व दिले जाते असे नाही. त्यातच ओबीसी नेत्यांची जागा छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांनी भरून काढलेली आहे. स्वत: ओबीसी असलेले खडसे उद्या राष्ट्रवादीत गेले तर ओबीसींच्या नेत्यांच्या रांगेतही ते चौथ्या-पाचव्या क्रमांकावर असतील.

खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे या रावेरच्या भाजप खासदार आहेत. खडसेंनी पक्षांतर केले तरी रक्षाताई भाजपमध्येच राहतील, असे त्यांचे निकटवर्ती सांगतात. हे खरे असेल तर गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर खडसेंचे घर फोडल्याची टीका शरद पवार यांच्यावर होईल. मुंडे यांचे पुतणे धनंजय यांना काही वर्षांपूर्वी पवारांनी राष्ट्रवादीत नेले होते. राष्ट्रवादीत गेल्याने खडसेंना आमदारकी भलेही मिळेल; पण जळगाव जिल्ह्याचे सर्वेसर्वा नेता ते बनू शकतील का? भाजपमध्ये असताना ते वर्षानुवर्षे जिल्ह्याचे अनभिषिक्त नेते होते. सुरेशदादा जैन यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचे संस्थान खालसा करण्यात त्यांना यश आले; पण नंतर खडसेंचा प्रभाव कमी झाला आणि गिरीश महाजन यांनी त्यांची जागा घेतली. आजही जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व महाजन यांच्याकडेच आहे. राष्ट्रवादीत गेले तर खडसेंच्या हाती पूर्ण पक्ष देऊन त्यांना सर्वेसर्वा केले जाण्याची शक्यता दिसत नाही. एवढे असूनही खडसे राष्ट्रवादीत जाणार असतील तर ते मोठी जोखीम पत्करत आहेत असा त्याचा अर्थ होईल. अर्थात, भाजपशी असलेली नाळ खडसे स्वत:च्या हाताने तोडून टाकत आहेत. अशा वेळी त्यांना पर्यायाचा विचार करावा लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER