जतिंद्रनाथ यांची योजना यशस्वी झाली असती तर भारत १९१५ लाच स्वतंत्र झाला असता!

Maharashtra Today

सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी सश्त्र लढा उभारला हे आपण ऐकून आहोत, पण याचा पाया रचला गेला होता १९१५ साली. जतिंद्रनाथ मुखर्जी यांनी. इंग्रजांच्या मनात त्यांच्या विषयी मोठी दहशत होती. जतिंद्रनाथ यांच्या मृत्यूनंतर एका इंग्रज अधिकाऱ्याच्या तोंडून निघालेले शब्दच जितेंद्रनाथांच्या शौर्य (Jitendranchanya Shaurya) आणि पराक्रमाची गाथा सांगतिल. इंग्रज अधिकारी म्हणाला होती, ” जर या माणसाला आणखी काही वर्ष आयुष्य लाभलं असतं तर यानं जगाचं नेतृत्त्व केलं असतं.”

जितेंद्रनाथ इतक्या भल्या प्रतिभेचे धनी होते. भारतीयांसाठी ते नायक होते, स्वातंत्र्यवीरांचा अभिमान आणि इंग्रजांसाठी दहशत. हा तोच क्रांतीकारी आहे ज्यानं इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेल्ससमोर इंग्रज अधिकाऱ्याला जबर मार दिला होता.

बंगालच्या कायाग्राम या गावात ७ डिसेंबर १८७९ ला त्यांचा जन्म झाला. ते पाच वर्षाचे असताना त्यांच्या डोक्यावरुन वडीलांच छत्र हरपलं. त्यांच्या आईनं त्यांचा सांभाळ केला. मोठे झाल्यानंतर त्यांनी स्टेनोग्राफी शिकुन कुटुंब खर्च चालवण्यासाठी कलकत्ता विद्यापीठात त्यांनी नोकरी सुरु केली. लहानपणापासून त्यांच शरिर दणकट होतं. धाडस करायला ते कधीच मागं पुढं पहात नसत. गरिबांवर होणारा अन्याय अत्याचार त्यांना सहन व्हायचा नाही. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचा सामना जंगलातल्या वाघाशी झाला होता. मोठ्या धैर्यानं लढत त्यांनी वाघाला ठार केलं. तेव्हा पासून त्यांचे साथी त्यांना ‘वाघ जितन’ या नावानं हाक मारू लागले.

त्यांचे विचार वेळेच्या खुप पुढचे होते. भगनी निवदेता यांच्यासोबतीन त्यांनी सामाजिक कार्यातही मोठं काम केलं. भगनी निवदेतांनी जतिंद्रनाथ यांची भेट स्वामी विवेकानंद यांच्याशी घडवून आणली. विवेकानंदांनीच त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. विवेकानंदांनी मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी युवकांना जोडायला सुरुवात केली. पुढं चालून ते अरबिंदो यांच्या संपर्कात आले. त्यांच्या सहवासातच त्यांच्या मनातल्या विद्रोहाच्या भावनेनं बाळसं धरलं. युवकांच एकत्रीकरण करुन त्यांनी संघटना बांधली. ही एक भूमिगत संघटना होती. नाव होतं, ‘युगांतर पार्टी.’ या संघटनेच नेतृत्व स्वतः जितेंद्रनाथ यांच्याकडं होतं. युगांतरच्या कामाची पद्धत आणि युवकांना जोडून घेण्याची कला यामुळं देशासह विदेशातल्या अनेक युवकांनी युगांतर पार्टीशी स्वतःला जोडून घेतलं.

हिंसात्मक मार्गाचा अवलंब करुन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात त्यांना काहीच गैर वाटत नव्हतं. इंग्रजांच्या भाषेत इंग्रजांना उत्तर देण्यात ते पटाईत होते. १९०५ साली जेव्हा इंग्लंडचा राजकुमार ‘प्रिन्स ऑफ वेल्स’चा कलतकत्त्याला येणार होता. त्यांच्या स्वागतासाठी मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा एका गाडीवर इंग्रज अधिकारी बसले होते आणि गाडीच्या खिडकीत बसलेल्या महिलांच्या तोंडाजवळ त्यांचे बुट लटकत होते. हे बघून जतिंद्रनाथ भडकले. त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना चोप द्यायला सुरुवात केली. त्यांना बघून इतर लोकही गाडीवर चढून इंग्रज अधिकारांना चोप देत होते, आणि हे सर्व प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या समोर घडत होतं.

तेंव्हापासून इंग्रजांचा जतिंद्रनाथ यांच्यावर डोळा होता. १९०८ च्या अलिमपुर बॉम्ब प्रकरणात जतिंद्रनाथ यांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं. पण इंग्रजांच्या ताब्यात येतील ते जतिंद्रनाथ कसले? त्यांनी इंग्रजांना हुलकावणी दिली. ते निसटले आणि भारतभर युवकांना जोडण्यास त्यांनी सुरुवात केली. बंगाल, ओडीसा, बिहार आणि उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या शहरात क्रांतीकाऱ्यांना जोडण्याच काम करत राहिले. २७ जानेवारी १९१० ला त्यांना अटक करण्यात आली पण पुराव्यांअभावी त्यांची सुटका झाली. तुरुंगातून परतले तेव्हा स्वातंत्र्याची भावना अधिक प्रखरतेने त्यांच्या मनात तेवत होती. ‘रासबिहारी बोस’ यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली. पुढं चालून रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत सिंहाचा वाटा उचलला.

त्यांनी अनेक मार्चोंवर इंग्रजांना त्रास द्यायला सुरुवात केली. इंग्रज त्यांच्या कारवाईंना वैतागले होते. शेवटी इंग्रजांनी गुडघे टेकले. १९१२ साली त्यांनी कलकत्त्यातून दिल्लीला राजधानी हलवण्याचा निर्णय घेतला. १९१४ साली पहिल्या महायुद्धानंतर युगांतर पार्टीनं बर्लिन समिती आणि जर्मनीतल्या भारतीय स्वतंत्रता पार्टीच्या स्थापनेत महत्त्वपुर्ण भूमिका बजावली.

जतिंद्रनाथ यांना क्रांतीकारी कारवाईंसाठी जर्मनीतून होणारी मदत इंग्रजांच्या लक्षात आली. इंग्रजांनी जतिंद्रनाथांना पकडण्यासाठी शोध मोहिम हातात घेतली. जतिंद्रनाथ यांनी ओडीसातल्या जंगलात आसरा शोधायला सुरुवात केली. इंग्रजांना त्यांच्या ठिकाण्याचा पत्ता लागला. जतिंद्रनाथ यांच्या धरपकडीसाठी इंग्रजांनी मोठी फौज मागवली. जतिंद्रनाथांच्या शोधाला सुरुवात झाली.

९ सप्टेंबर १९१५ साली जतिंद्रनाथ मुखर्जी आणि त्यांच्या साथिदारांनी बालासोरमध्ये चाशाखंड क्षेत्रातील पर्वतीय भागात पाऊसापासून वाचण्यासाठी आसरा घेतला होता. त्यांच्यासोबत इतर चार साथिदार होते. इंग्रजांनी या पाच जणांचा पत्ता सांगावा म्हणून सगळीकडं दवंडी पिटली होतीच. इंग्रजांनी मागोवा काढत ते लपलेल्या ठिकाणावर गोळीबार करायला सुरुवात केली. ही चकमक ७५ मिनीटं चालली. शेवटी दुसऱ्याबाजूने गोळीबार बंद झाल्यानं इंग्रज पुढं सरकले. जतिंद्रनाथ गंभीर जखमी झाले होते. तर त्यांचे साथीदार शहीद झाले होते. जतिंद्रनाथांना बालासोरच्या इस्पितळात भरती करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. बऱ्याच इतिहासकारांचं म्हणन आहे की जतिंद्रनाथ यांनी आखलेली योजना यशस्वी झाली असती तर भारत १९१५ सालीच स्वतंत्र झाला असता.

कलकत्त्याचे पोलिस विभागातील गुप्तहेर विभागाचे प्रमुख चार्ल्स टार्गेट म्हणाले होते, “जर जतिंद्रनाथ इंग्रज असते तर त्यांच स्मारक आज लंडनच्या ट्रेफलगर स्केअर शेजारी त्यांच स्मारक असतं. जतिंद्रनाथ यांचा मृत्यू झाला पण भारतातल्या सशस्त्र लढ्यानं सैन्याचं रुप घेतलं. रासबिहारी बोसांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि पुढं या सैन्याच नेतृत्व सुभाष बाबूंनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER