‘…तर ईडीच्या कार्यालयासमोर त्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही’

Sanjay Raut

मुंबई :- मागील अनेक दिवसांपासून भाजपा (BJP) नेते किरीट सोमय्या (v) शिवसेनेवर गंभीर आरोप करत असून शिवसेना (Shiv Sena) त्यांच्याविरोधात मोठी रणनीती आखात आहे. त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती शिवसनेच्या एका जेष्ठ नेत्याने दिली आहे. दरमयान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही एबीपी माझाशी बोलत किरीट सोमय्या यांचे नाव न घेता निर्वाणीचा इशारा दिला आहे. काही जणांकडून आज शिवसनेच्या नेत्यांवर बेफाट आरोप केले जात असून त्यातून काही उघड होणार नाही. मात्र आरोप सिद्ध झाले नाहीत तर अश्या आरोप करणाऱ्या लोकांना ईडीच्या कार्यालयासमोरच जोड्याने मारणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला.

यावेळी राऊत म्हणाले की, ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. कुठलेही कागदपत्र दाखवतात आणि आरोप करत सुटतात. प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसंच मी आणि माझ्या कुटुंबासोबत हेच केलं. हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवले पाहिजेत. अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे ते न्यायालयात चालत राहणार पण आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं आहे, असा निर्वाणीचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

राजकारण, समाजकारणात, पत्रकारितेत अनेक वर्ष काम करताना आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलं. तुमच्यासारखे फडतूस लोक आमच्यावरती आरोप करत बसावेत आणि त्याबद्दल वाईट प्रसिद्धी मिळावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता केली नाही. ही कायद्याच्या पलीकडची भाषा असेल, पण मला आणि पक्षाला प्रतिष्ठा महत्वाची आहे. जे कायद्याच्या पलीकडे जाऊन भाष्य करत आहेत त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? पक्षाने आमचा या व्यक्तीशी कोणताही संबंध नाही असं सांगावं. ही माकडं उड्या मारत आहेत त्यांच्याशी संबंध नाही असं त्यांनी सांगावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान त्यांनी नेत्यांची सुरक्षाव्यवस्था कमी केल्याच्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया दिली. नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात कोणतंही राजकारण करण्यात आलेलं नाही. याआधी आमच्याही सुरक्षा काढण्यात आल्या आहेत. पण म्हणून आम्ही कधी त्याचा बोभाटा केला नाही. मागच्या वेळी आम्ही सरकारमध्ये असतानाही सुरक्षा काढून घेण्यात आली होती, पण मी एका शब्दाने तक्रार केली नाही. सरकारी यंत्रणांची एक कमिटी असते त्यामध्ये महत्वाची लोकं असतात, ते निर्णय घेत असतात. महाराष्ट्राचं सरकार जागरुक आणि संवेदनशील आहे. विरोधकांच्या जीवाशी खेळावं किंवा सूडबुद्दीने वागावं असा ट्रेण्ड राष्ट्रीय राजकारणात सुरु आहे. अशा प्रकारची भावना आणि भूमिका उद्धव ठाकरे सरकारची नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे (Congress) आहे. विदर्भातील नाना पटोले (Nana Patole) तिथे अध्यक्ष आहेत. प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद बदललं जात असून जी काही नावं आहेत त्यात नाना पटोलेंचं नाव असल्याचं मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहत आहे. आता हा शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) असणाऱ्या एका प्रमुख पक्षातील या घडामोडी आहेत. त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण आमच्यातील कोणताही पक्ष अंतर्गतसुद्धा अस्थिर होऊ नये, अस्वस्थता राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. तरच हे तीन पक्षांचं सरकार हे प्रदीर्घ काळ चालणार आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

ही बातमी पण वाचा : बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला?, संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER