‘जीएसटी’ माफ केल्यास कोरोनावरील औषधे, लसी होतील महाग – निर्मला सीतारामन

Maharashtra Today

नवी दिल्ली : करोनावरील औषधे, लशी आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी उपकरणांचा देशांतर्गत पुरवठा तसेच व्यावसायिक आयातीवरील वस्तू आणि सेवा कर(GST) (जीएसटी) पूर्णत: माफ केल्यास त्या वस्तूंच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतील. कारण उत्पादकांना त्यांच्या उत्पादन साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर भरलेल्या कराचा परतावा अर्थात ‘इनपुट क्रेडिट टॅक्स’ (Input credit tax)चा लाभ मिळणार नाही आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी रविवारी सांगितले.

‘जीएसटी’त पूर्णत: सूट दिल्यास लस उत्पादक कराची भरपाई करू शकणार नाहीत, तो भार किंमती वाढवून नागरिक किंवा ग्राहकांवर टाकतील. सध्या लसींवर पाच टक्के जीएसटी आकारला जातो. त्यामुळे उत्पादकांना ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’चा लाभ मिळविता येतो आणि कर परताव्याचा दावाही करता येतो. त्यामुळे लसींवरील जीएसटी पूर्णत: माफ करणे ग्राहकांसाठी लाभदायक नाही, असे ट्वीट सीतारामन यांनी केले आहे.

सध्या देशांतर्गत उत्पादित लसी आणि त्यांच्या व्यावसायिक आयातीवर ५ टक्के जीएसटी आकारला जातो, करोना औषधे आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स यांच्यावर १२ टक्के जीएसटी वसूल केला जातो.

लसींवर आकारलेल्या जीएसटीचा निम्मा वाटा केंद्राला आणि निम्मा वाटा राज्याला मिळतो. केंद्राच्या वाटय़ातील ४१ टक्के वाटा पुन्हा राज्यांना दिला जातो. याचा अर्थ लसींवरील जीएसटीद्वारे केंद्राला मिळालेल्या महसूलापैकी सुमारे ७० टक्के महसूल राज्यांना मिळतो, असे सीतारामन म्हणालात.

संस्थांकडून दान म्हणून मिळणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, प्राणवायू सिलिंडर्स, साठवणूक टाक्या, करोना औषधे इत्यादींवरील जीएसटी आणि सीमाशुल्क अर्थात आयात कर माफ करण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यांच्या पत्राला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी, या वस्तूंवरील सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर आधीच माफ केला गेल्याचे ट्वीट केले. त्याशिवाय इंडियन रेडक्रॉसने नि:शुल्क वितरणासाठी आयात केलेल्या करोनाशी संबंधित सर्व साहित्यावरील ‘आयजीएसटी’ही माफ करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

करोना उपचार आणि प्रतिबंध याच्याशी संबंधित वस्तूंची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने त्यांच्या व्यापारी आयातीवर मूलभूत सीमा शुल्क आणि आरोग्य उपकर पूर्ण माफ केला आहे, रेमडेसिविर इंजेक्शन आणि त्याचे घटक, इन्फ्लेमेटरी डायग्नोस्टिक किट, वैद्यकीय प्राणवायू, प्राणवायू उपचाराशी संबंधित उपकरणे यांच्यावरील आयात शुल्कातही सरकारने आधीपासून सूट दिली आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button