शेतमालास योग्य भाव दिल्यास शेतकरी कर्ज माफी मागणार नाही : शरद पवार

pawar

नागपूर: 2006 मध्ये यूपीएच्या कार्यकाळात झालेल्या कर्जमाफीचा फायदा झाला. बऱ्याचश्या शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली. नवे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शेतीचे उत्पादन वाढून गहु, साखर, कापूस निर्यात करण्याची देशाची क्षमता निर्माण झाली असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरत पवारांनी ठामपणे सांगितले. शेतमालास योग्य भाव दिल्यास शेतकरी कर्जमाफी मागणार नाहीत, असे स्पष्ट केले. आपण स्वतः अनेक शेतकऱ्यांशी बोललो असून त्यांना योग्य भाव दिला तरीही पुरे आहे असा दावा त्यांनी केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवस निमित्त नागपूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी शनिवारी हा संवाद साधला आहे. देशात किंवा राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही असे म्हणत शरद पवार यांनी याबाबत सुरू असलेल्या चर्चांना विराम लावण्याचा प्रयत्न केला. यासोबतच, विरोधक पीएम नरेंद्र मोदी यांना पर्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, काश्मीरची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. या संवेदनशील विषयावर कुठलेही राजकारण न करता सरकारने काश्मिरी घटकांशी चर्चा सुरू केली पाहिजे.

गेल्या काही दिवसांपासून विविध नेत्यांकडून मध्यावधी निवडणुकीचे भाकित वर्तवले जात आहे. मात्र, पवारांनी ही शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. केंद्रात एका पक्षाला बहुमत आहे. त्यामुळे, मध्यावधीची शक्यता नाही. राज्यातही ती शक्यता दिसत नाही. भाजप आणि शिवसेनेत भांडणे होत राहतील. पण निवडणुकांची शक्यता वाटत नाही, असे पवार यांनी सांगितले.

नुकतेच झालेल्या सर्वेक्षणांमध्ये पंतप्रधान मोदींचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे दिसून आले. यावर पवार म्हणाले, लोकांना शेवटी पर्याय हवा असतो. तो पर्याय देण्यात अद्याप तरी विरोधी पक्षांना यश आलेले नाही. काँग्रेसच्या वतीने जो उमेदवार प्रोजेक्ट केला जातोय, तो पुरेसा नाही. मात्र, आता लोकांमध्ये नाराजीची भावना प्रकट व्हायला सुरुवात झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.