फडणवीस बेळगावला प्रचारास आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे स्पष्ट होईल- शुभम शेळके

Shubham Shelke - Devendra Fadnavis - Maharastra Today
Shubham Shelke - Devendra Fadnavis - Maharastra Today

बेळगाव : सध्या बेळगाव येथे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराने वेग धरला आहे. काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बेळगावात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्यासाठी जंगी प्रचारसभा घेतली. तसेच बेळगाव भागातील मराठी मते फुटू नये यासाठी भाजपच्या नेत्यांनी बेळगावात प्रचारसभा घेऊ नये, असे आवाहनही केले होते. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस हे बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी येणार आहेत. त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस हे बेळगावात प्रचाराला आले तर ते महाराष्ट्रद्रोही आहेत हे सिद्ध होईल. गेल्या वेळी आम्ही फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सीमाप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली होती. तेव्हा आताच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा महाराष्ट्रातील कोणताही नेता प्रचारासाठी येणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. पण तसे झाले तर तो नेता महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्रोही असल्याचे सिद्ध होईल, असे शुभम शेळके यांनी सांगितले. शुभम शेळके यांनी गुरुवारी बेळगावात ‘टीव्ही-९ मराठी’शी संवाद साधला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, बेळगावातील मराठी जनता आता सुज्ञ झाली आहे. भाजपकडे कुठलेही मुद्दे नाहीत. त्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा डाव आहे. पण आता मराठी माणूस जागा झाला आहे.

राष्ट्रीय पक्षांचा ढोंगीपणाचा बुरखा फाटला आहे. त्यांच्या डावपेचांचा मराठी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीवर काहीही फरक पडणार नाही, असे शुभम शेळके यांनी म्हटले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रीय पक्षाच्या प्रचाराला कोणत्याही नेत्याने येऊ नये, असं आवाहन आम्ही यापूर्वी केलं होतं. बाकीच्या पक्षांकडून तसा प्रतिसाद आला. मी अपेक्षा व्यक्त केली होती की, महाराष्ट्र भाजपमधून कुणी येऊ नये. पण आता तसं होत असेल तर दुर्दैवी आहे, असे शुभम शेळके म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button