ईव्हीएम हॅक न झाल्यास राज्यात आमची सत्ता : प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar

कोल्हापूर :- ईव्हीएम हॅक न झाल्यास आम्ही सत्तेत येऊ, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कोल्हापूर येथे त्यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. लोकांना बदल हवा आहे हे महारॅलीच्या माध्यमातून दिसून आल्याचे ते म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीला आम्ही विचारत नसून आमचा लढा भाजपची असल्याचे ते म्हणाले. सत्तेवर आल्यास घरगुती वापराच्या गॅसचे सिलिंडरमागे १०० रुपये अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली.

उज्ज्वला गॅस योजनेत भाजपने काँग्रेसच्या कामाची कॉपी केल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले, गॅस सिलेंडर जनतेला परवडत नाही. त्याचप्रमाणे सत्तेत आल्यास लिंगायत धर्माला मान्यता देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ओबीसीची जनगणना करणार असल्याचेही ते म्हणाले. एमआयएमसोबतच्या आघाडीसंदर्भात सध्या चर्चा सुरू असल्याचे सांगताना ते म्हणाले, एमआयएमसाठी आमचे दरवाजे मोकळे आहे. तसेच लवकरच आघाडी जाहीर करू; २८८ जागा लढण्याचा निर्धार कायम असल्याचे त्यांनी सांगितले. आघाडी तुटल्याचे एमआयएमतर्फे जाहीर केल्यानंतरही प्रकाश आंबेडकरांनी ही तलवार टांगती ठेवली होती.