वीज कापायला आलात तर मनसे स्टाईल ‘शॉक’ देऊ; अविनाश जाधव यांचा इशारा

Avinash Jadhav-Raj Thcakeray

ठाणे : वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे. वीज बिलाच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही. वीज बिल न भरल्याने  (Avinash Jadhav) वीज कापायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाईलने ‘शॉक’ देऊ, असा इशारा मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला.

लॉकडाऊनदरम्यान जनतेला आलेलं वाढीव वीज बिल माफ व्हावं यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली. काही वेळा आमच्या कार्यकर्त्यांनी कायदाही हातात घेतला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहिले; पण त्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही. ऊर्जामंत्र्यांनी वीज बिल माफ होणार नाही, असं  जाहीर केलं. लोकांकडून जबरदस्ती वीज बिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा, असं  जाधव म्हणालेत.

वीज वापरली असेल तर बिल भरावं लागेल; वीज बिलात कुठलीही माफी अथवा सवलत नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. त्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यावरून मनसेसोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही सरकारला इशारा दिला आहे. ‘वीज बिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसं उत्तर देऊ’, असे आव्हान राजू शेट्टी यांनी दिले.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही नितीन राऊत यांच्या भूमिकेवर ‘अजब सरकारचा गजब यू टर्न’, असं ट्विट करत टीका केली आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यात कोणताही अधिकारी बळजबरीने वीज बिल घेण्यासाठी अथवा वीज कापण्यासाठी आला तर मनसेचे कार्यकर्ते कायदा हातात घेतील आणि याची पूर्ण जबाबदारी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांची असेल, असा इशारा मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER