अनिल देशमुखांनी राजीनामा दिला तर पुढचा गृहमंत्री कुणाच्या गटातील असेल?

Maharashtra Today

अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनंतर महाविकास आघाडी आणि विशेषतः गृहमंत्र्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होताना दिसतीये. या प्रकरणाचे पडसाद लोकसभेतही उमटले. राज्यातले भाजपचे बडे नेते आमदार गिरीश बापट, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार देशमुखांचा राजीनामा मागत आहेत. अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरलं होतं. त्यावेळी त्यांच्या बचावासाठी राष्ट्रवादीचे आमदार दिसले नाहीत. तशीच परिस्थीती अधिवेशन संपल्यानंतरही आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार सोडले तर कुणीच ठामपणे देशमुखांच्या पाठीशी उभं असल्याच दिसत नाही. देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच त्यांची पाठराखण करण्यामागे राजकिय गणित असल्याची चर्चा सध्या रंगलीये.

अंतर्गत गटबाजी

देशमुखांच्या वाढलेल्या अडचणीत त्यांची साथ कशी द्यायची ह्या ऐवजी, देशमुखांवर राजीनाम्याची वेळ आलीच तर गृहमंत्री पद कोणाकडे द्यायचं याचीच चिंता राष्ट्रवादीला जास्त असल्याचं राजकीय विश्लेष्क सांगतायेत. महाविकास आघाडीत खाते वाटपानंतर गृहमंत्रीपद राष्ट्रवादीला आलं. त्यामुळं पुढचा गृहमंत्री झालाच तर तो राष्ट्रवादीचाच असेल. संभाव्य गृहमंत्र्यांच्या यादीत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) ही नावं होतीच पण आता राजेश टोपेंसह दिलीप वळसे पाटलांच्या नावाची ही चर्चा आहे.

अजित पवारांना गृहमंत्रीपदाची अपेक्षा होती पण अशा अडचणीच्या वेळी ते गृहमंत्रीपद स्वीकारतील का नाही? यात शंका असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतायेत. तर दुसऱ्या बाजूला आपल्या गटातील आमदाराला गृहमंत्रीपद मिळावं, या प्रयत्नात अजित पवार (Ajit Pawar) असल्याचं बोललं जातंय.

राष्ट्रवादीतली गटबाजी प्रामुख्यानं जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणनं आहे.तर शरद पवारांचे (Sharad Pawar) सर्वात विश्वासू कार्यकर्ते अशी ओळख जयंत पाटलांनी मिळवलीये. दोन्ही गटांचा विचार करत शरद पवार काय भूमिका घेतात याकडं सर्वाचं लक्ष असेल.

…तर चुक मान्य केली असा संदेश जाईल

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या संजय राठोडांनी राजीनामा दिला. या घटनेला अजून महिनाही पुर्ण झालेला नाही. त्यात दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतला तर महाविकास आघाडी बॅक फुटवर ढकलली जाईल, ही शक्यता महाविकास आघाडी नाकारु शकत नाही. शिवाय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही जोर धरतीये. मध्यवर्ती निवडणूकांची वेळ आलीच तर देशमुखांचा राजीनामा अडचणींचा ठरु शकतो, याची जाण राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे.

अँटेलियापासून सुरु झालेल्या या प्रकरणाची लोकसभेत चर्चा झाली. यामुळं हे प्रकरण आणि गृहखातं सांभाळायला अनिल देशमुख कमी पडल्याचं मत पत्रकारांकडून व्यक्त केलं जातंय. देशातल्या सर्वात श्रीमंत माणसाच्या घराबाहेर स्फोटकं आढळतात. स्फोटक ठेवणारा निलंबित पोलिस अधिकारी सचिन वझे याचा शिवसेनेशी संबंध असल्याचं स्पष्ट होतं. यानंतर गृहमंत्र्यांनीच तब्बल 100 कोटींच्या वसुलीची मागणी केली, या आरोपापर्यंत प्रकरण येऊन थांबलं आहे. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास आपलाच मंत्री यात सहभागी आहे, अशी कबुली दिल्यासारखे होईल, अशी राजकीय वर्तूळाच चर्चा आहे.

फडणवीसांना श्रेय मिळेल

अँटेलिना प्रकरणावेळी सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीसांनी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) कोंडी केली. सचिन वझेच्या निलंबणाची त्यांनी मागणी केली होती. या प्रकरणानं वेगवेगळी वळणं घेतली. तेव्हा पासून देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला धारेवर धरलंय. राज्यात कायदा आणि सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याच ते वारंवार सांगतायेत. देशमुखांचा राजीनामा घेतला तर फडणवीसांना त्याचे श्रेय मिळेल, असा विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या असल्यामुळं देशमुखांचा राजीनामा रोखून धरला असेल असं मत राजकीय विश्लेष्क व्यक्त करतायेत.

“परमबीर सिंग आणि सचिन वाझे ही या प्रकरणातली छोटी नावं आहेत. त्यांच्या मागे कोण उभं होतं ते शोधायला हवं. जे त्यांच्या आडून सगळं काम करत होते ते आजही या सरकारचा भाग आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरण केवळ परमबीर सिंग यांच्यापर्यंत थांबणारं नाही, तर यामागचे राजकीय बॉसेसही शोधायला पाहिजेत.” फडणवीसांनी केलेल्या या विधानामुळं राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा या प्रकरणात सहभाग आहे का? असा प्रश्न उपस्थीत करायला वाव मिळतो.

अँटिलिया स्फोटक प्रकरणापासून सुरू झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर हे प्रकरण थेट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत पोहचलंय. वरील राजकिय शक्यतांचा विचार करुन पवार देशमुखांना पाठीशी घालतील का राजीनामा द्यायला लावतील, याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो.

ही बातमी पण वाचा : गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद? हायकमांडला रात्रीच अहवाल देणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button