गुजराती माणसाने उद्धव ठाकरेंना ‘आपडा’ म्हटले तर तुमचा तीळपापड का झाला? – शिवसेना

Hemraj Shah-Uddhav Thackeray

मुंबई :   मुंबईत सध्या ‘जिलेबी-फाफडा’चे  (Jilebi-fafda) राजकारण चांगलेच तापले आहे. येत्या १० तारखेला जोगेश्वरीत शिवसेनेचा गुजराती मेळावा होणार आहे. त्याची टॅगलाईन ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा उद्धव ठाकरे आपडा’ अशी आहे. या टॅगलाईनवरून  पोटात दुखावे अशी स्थिती मुंबईत विरोधकांची झाली आहे. मात्र, गुजराती माणसाने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) ‘आपडा’ म्हटले तर तुमचा तीळपापड का झाला, असा सवाल आता शिवसेनेचे  संघटक हेमराज शाह (Hemraj Shah) यांनी उपस्थित केला आहे.

हेमराज शाह हे शिवसेना संघटक असून त्यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता शाह हे भाजप नेत्यांच्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले. १९९२-९३ च्या दंगलीवेळी शिवसेनेने गुजराती बांधवांना मदत केली, त्यांचे संरक्षण केले. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सर्वधर्मीयांना आपलेपणाने वागवल्याचे हेमराज शाह यांनी म्हटले. हेमराज पुढे म्हणाले, भाजपने नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे करून फक्त मतांपुरते गुजराती बांधवांना वापरले.

‘आपडो माणस’ म्हणत नुसती गुजराती बांधव आणि भगिनींची मते घेतली आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडले हेच खरे आहे ना? असा सवाल हेमराज शाह यांनी भाजप नेत्यांना विचारला. मुंबईतील गुजराती समाजाचे नेते भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे. गुजराती माणूस स्वाभिमानी आहे. भाजपने त्याला स्वत:ची जहागीर समजू नये. उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत व्यक्ती आहेत. त्यामुळे ते गुजराती माणसाला ते ‘आपडा’ वाटणारच, असेही हेमराज शाह यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER