बेइमान सरकार पडले तर आम्ही पर्यायी सरकार देऊ, मनसेसोबत जाणार नाही : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

सोलापूर : शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घर, कार्यालयावर ईडीच्या छाप्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलेले आहे. यावर कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi), मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बेइमानी करून आलेले सरकार पडले की आम्ही पर्याय देऊ, असे आव्हान देत मनसे (MNS) युतीबाबतही भूमिका मांडली आहे.

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, त्यांची चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी. संजय राऊत टीका करण्याशिवाय दुसरं काय करणार, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. ईडीनं कधी भाजप (BJP) नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देतो. ईडीनं त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘राऊत यांनी १०० लोकांची यादी माझ्याकडे द्यावी. त्यांच्यावर कारवाई होईल हा माझा शब्द आहे.’ असं फडणवीस म्हणाले.

राज्य सरकार नाकर्तेपणा दाखवत आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. मात्र, तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आगामी काळात मनसेला सोबत घेणार नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. पुणे पदवीधर मतदरासंघातून चंद्रकांत पाटील दोन वेळा निवडून आलेत. ही जागा आम्ही जिंकू हा आम्हाला विश्वास आहे. राज्य सरकारच्या विरोधात पदवीधर आणि शिक्षकांमध्ये प्रचंड रोष आहे, तो मतदानात परावर्तित होईल. सध्या येथून संग्राम देशमुख निवडणूक लढवत आहेत. पुणे शिक्षकमधून शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार यांना भाजपनं पाठिंबा दिला आहे. दोन्ही उमेदवारांना विजयी करावं, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. वाढीव वीज बिलाच्या संदर्भात सरकारनं घूमजाव केलं आहे. राज्य सरकारनं पलटी मारली आहे.

त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. अतिवृष्टीमुळं सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नदीकाठावरील ऊसासह सर्व पिकांचं मोठं नुकसान झालं. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणाला काही मिळालं नाही. फळबागांना कोणतीही मदत देताना दिसत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारकडे वर्षपूर्तीनिमित्त काहीही सांगण्यासारखं नाही. तीन पक्षांचे पायपोस एकमेकांच्या पायात नाहीत. सोलापूरमध्ये दोन दिवसांपूर्वी महाआघाडीचे सर्वोच्च नेते सुशीलकुमार शिंदे यांना ते विसरले.

तिन्ही पक्षांच्या अनैसर्गिक युतीचा भोग सर्वसामान्य जनतेला भोगायला लागतोय, असा आरोप फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) शरद पवारांविषयी (Sharad Pawar) काय बोलले त्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलतात. मात्र, पवारसाहेबांबद्दल काय बोलले की निवडक भाग घेऊन टीका करतात.

चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्यासाठी तो विषय संपल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिले. महावितरणच्या थकबाकीबद्दल पाहिजे ती चौकशी लावावी, तोंडावर पडतील. २० वर्षांतील प्रकरणांची चौकशी करावी. तीन वर्षे  सातत्यानं दुष्काळ असल्यामुळं शेतकऱ्यांची वीज कापली नाही. आम्ही सावकारी प्रवृत्तीचे नाही, तुम्ही सावकारी करून वीज बिल वसूल करत आहात, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER