“ओळख भावभावनांची !”

Emotions

आजी-आजोबा टीव्ही बघत असताना आजी सारख्या प्रतिक्रिया देत असते,”अग बाई ग ! च! च! सगळे चुकीचं चालू आहे सध्या जगात ! “वगैरे वगैरे त्यांनी आमची करमणूक होत असते.

अशा बऱ्याच घटना दररोज आपल्या मनाविरुद्ध चुकीच्या घडत असतात .एकूणच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीत काय घडतं ,सभोवतालच्या व्यक्ती ज्या प्रकारे वागतात ,त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणजे उद्दीपित करणाऱ्या गोष्टी (स्टिम्युलस )आणि त्याला जाणारी प्रतिक्रिया ही आपल्या दैनंदिन व्यवहारातील नेहमीची घडणारी घटना !

अगदी जैविक पातळीवरही याचा वारंवार प्रत्यय येतो .पव्हेलोव या मानसशास्त्रज्ञाने “लर्निंग “म्हणजे शिकण्याची क्रिया कशी होते? हे सांगताना जे प्रयोग केले त्या वेळी घंटा वाजल्यानंतर प्रयोगातील कुत्र्याच्या लाळ उत्पन्न करणार्या ग्रंथी उद्दीपित होतात. हे आपण वाचलं आणि ऐकलं असणार. अगदी साधं ! फोडणीत मिरच्या, तिखट टाकल्यानंतर किंवा घरात ठेचा करताना येणारा ठसका आपण सगळ्यांनी अनुभवला असणार! क्रिया आणि त्यावरील प्रतिक्रिया!

असेच परिणाम आर्थिक, सामाजिक, राजकीय घटनांचे ही होत असतात .त्याच्या प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनात सतत उमटत असतात .म्हणूनच वैयक्तिकरीत्या प्रत्येकच माणूस आजकाल “डिप्रेस” होतो .

पण तो खरंच “depress “च होतो का ? होणारा परिणाम हा केवळ निराशा या एकाच भावनेने पुरता मर्यादित असतो का?

उदाहरणार्थ : दररोजची रूटीनची कामे स्नेहल अगदी व्यवस्थित करते. दोन दिवस दिर आणि इतर नातेवाईक पाहुणे म्हणून येतात. नेमके त्याच दिवशी स्नेहल एका कार्यक्रमाला बाहेर जावे लागते. Korona काळात घरात बसून बोर झाल्याने आणि मैत्रिणीचा मन राखण्यासाठी ती जाण्याचा निर्णय घेते.

आता प्रत्यक्ष प्रसंग असा, स्नेहल नाश्त्यासाठी ची जुजबी तयारी करून गेलेली आहे.येईपर्यंत लोक उठणार नाहीत एवढ्या लवकर हा विचार करून! यायला थोडा उशीर झाला .नाश्तापाणी स्नेहलच्या सासूबाईंनी आटपून घेतले होते .

घरात शिरताना तिने संवाद सुरू केला,”छान झाला कार्यक्रम! चार महिन्यात घराबाहेरच पडले नव्हते ना त्यामुळे गेले! “(अपराधी भाव) .दररोज पूर्ण सकाळ सासुबाई यांची पोथी व पूजा चालते. आज नेमके दिरांना वाटेल ही वहिनी भटकत राहते आणि वयस्क आईला करावे लागते. (कुणाला काय वाटेल याची खंत करणारा स्व संवाद.)

हात-पाय धुऊन किचनमध्ये शिरते.”काय करायचे? विचारते .(सासूबाईंना राग आला आहे का याचा अंदाज घेते.– ताण अनुभव). मनात आणखीन एक भावना (अर्थात स्व संवाद )”दररोज तर कितीही कामे असो यांची पूजापाठ संपत नाही. ते इतके महत्वाचे असतात का ?आणि आज नेमके……!”

दुपारी सासर्यांचे दुपारचे खाण्याचे, चहा स्वतःहून विचारून करते आणि म्हणते, ” सकाळपासून भरपूर काम झाली ना आज! दमल्या असतील ना त्या ! आता मला वेळ आहे .करते ना मी!”

यात नेमकी कोणती भावना? खरंच काळजी वाटते आहे? की प्रेम वाटत आहे? की अपराधी भावनेची परतफेड? किंवा संमिश्र भावना!

स्नेहलच्या मनातील भाव भावनांचे कल्लोळ आपण जसे बघितले, तसे प्रत्येकाच्याच बाबतीत कमी-अधिक घडत असतात.

* नुकत्याच बदललेल्या नवीन नोकरीतील प्रोबेशन पीरियड असल्याने ,गौरव घरी दिवाळीत जाऊ शकत नसल्याने — निराश वाटते.

*आईच्या मनासारखे गुण मिळवू शकलो नाही. आता आईला काय सांगू ?असा विचार येऊन साकेत ला — निराश वाटते.

*नोकरीच्या निमित्ताने मुले दूर असतात .आतापासून तरी हात पाय हात चालतात आहे तोपर्यंत मुलाकडे न जाण्याचा निर्णय अजीत अरुणाने घेतला आहे. पण मधून मधून तिला–; निराश वाटतं.

*सेजल ला तब्येत ठीक नसल्यामुळे ट्रीपला येता आले नाही ,त्यामुळे तिची मैत्रीण गौरी पूर्ण ट्रिप भर– निराश आहे.

वरील चारही उदाहरणांचा आपण शेवट निराशा वाटण्याच्या भावनेने केला..!

पण खरंच ह्या सगळ्या भावना निराशेच्या आहेत का ?घरी जाऊ न शकल्याने, भावा बहिणींची भेट घेऊ न शकल्याने, त्यांना मिस करणे ,दुःख वाटणे, वाईट वाटणे ,एकटे वाटणे ,आठवण येणे या इतरही भावना तेथे येतीलच !

आईच्या मनासारखे गुण मिळवू शकलो नाही ,आता आईला काय सांगू? यात फक्त निराशा दडलेली आहे? नक्कीच नाही ! त्यांनी स्वतः प्रयत्न केले व मार्क्स कमी पडले तर साकेत ला वाईट वाटेल आणि निराशाही येईल कदाचित! पण आता आईच्या मनासारखे गुण नाही मिळालेले. आणि प्रश्न आईला उत्तर देण्याचा आहे. यात बराचसा अपराधी भाव, न्यूनगंडाची भावना ,स्वतःबद्दलचा राग आणि भीती, दबाव आणि ताण हे भाव आहेत.

अरुणाला आपल्या मुलगा सुने शिवाय राहताना दोघांना एकाकीपणा वाटतो ,असुरक्षितता वाटते, काही वेळात दूर असणाऱ्या मुलांची काळजी ,चिंता वाटते , कंटाळवाण होते .केवळ निराशा येत नाही .कारण तो त्यांनी स्वतःच्या मनाने घेतलेला ,सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून घेतलेला निर्णय असतो.

मैत्रीण ट्रीपला येऊ न शकल्याने तिला काय वाटत असेल? ती ट्रीप ला येऊ शकली नाही हा मैत्रिणीच्या भावनेतून गोरी जेव्हा विचार करते, त्याला आपण “तदनुभुतीची भावना “म्हणू शकतो.(empathy)

हे सांगण्याचा अर्थ असा की ,जीवनात जेव्हा विविध घटना घडत असतात ,त्याने केवळ निराशा येते असे नाही . भावनांच्या अनेक अनेक छटा आपल्याला त्यात पाहायला मिळतात .त्या पलीकडे जाऊन त्या, त्या घटनेकडे बघितले तर आपल्या मनात नेमक्या कोणत्या भावना आहेत हे ठरवता येते .आजकाल माध्यमिक शाळेतील मुलांपासून जेव्हा” डीप्रेस” या शब्दाचा वापर ऐकल्या जातो, त्यावेळी त्यांना “भावना ओळखण्याची कला” शिकवण्याची गरज वाटायला लागते .जेणेकरून आपली भावना ओळखणे ,ती स्वीकारणे ,आणि हळू हळू टप्प्याटप्प्याने त्या भावनेवर ताबा मिळवणे, हेहि शिकता येते.

या सगळ्या भावनांवर एकदम कंट्रोल करण्याऐवजी त्यांना बरेचदा त्यांचा ,त्यांचा वेळ घेऊ द्यावा लागतो . (फक्त ती भावना अनाठायी दूर पर्यंत “ग्रासत” नाही ना एवढं मात्र बघायला हव.) केवळ निराशे बद्दलच ( जनरल अर्थाने) बोलायचं झालं तर आली थोडी निराशा ,येऊ द्या !घेऊ द्या तिला तिचा ,तिचा वेळ ! कुणाशी तरी बोला ! किंवा सरळ डायरी लिहा!. लिहिता लिहिता कुठे काय बिनसलं नेमकं? त्यापाशी आपणच ,आपले, आपोआप पोहोचतो .आणि मग सरळ आशेचा किरण दिसु लागतो.

भावनांची ओळख आणि हाताळणी या दोन्ही गोष्टींना आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यातून मानसिक बळ मिळू शकते.मात्र नियमित सराव, सवयी, अनुभव आणि कृतीतून संस्कार मात्र घडावे लागतात.

आजकालच्या काळात मनोविकारांच्या उपचारांवर भर देण्याऐवजी ,”पॉझिटिव्ह सायकोलॉजी”ही महत्त्वाची शाखा मानली जाते .म्हणजे मनोविकार किंवा नकारात्मक विचार आल्यानंतर त्याची हाताळणी करण्याऐवजी , मुळातच सकारात्मक पैलूंवर भर देऊन आव्हाने पेलणे, मनोबल मिळवण्याच्या सवयी लावणे ,यावर आज भर आहे. (प्रिव्हेंटिव्ह केअर). त्या पार्श्वभूमीवर भावनांची ओळख आणि निगराणी हा एक महत्त्वाचा विषय आहे. यातून निराशा केव्हाच पळ काढेल ! कारण “दिल हे छोटासा ,छोटी सी आशा “त्याची मशागत सदैव चालू राहील.

मानसी फडके
एम.ए.मराठी.
एम एस काऊंसेलिग सायको थेरपी.
एम ए सायकॉलॉजी.

ही बातमी पण वाचा : “ओसरी : एक फ्रेंडशिप बेंच !”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER