बॉलिवूडमधील आदर्श पती-पत्नी

Abhishek Bachchan - Aishwarya Rai & Riteish Deshmukh & Genelia D'souza

बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकार म्हणजे चंचल. मग ती नायिका असो वा नायक. भुंग्याप्रमाणे एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे मन वळवणारे हे कलाकार. त्यामुळेच त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. प्रेम एकावर, लग्न दुसऱ्याशी, पुन्हा घटस्फोट आणि पुन्हा दुसऱ्याशी लग्न अशी अनेक प्रकरणे घडल्याची उदाहरणे बॉलिवूडमध्ये सर्रास सापडतात. पण अशा वातावरणातही असेही काही कलाकार आहेत ज्यांचे चित्रिकरणादरम्यान प्रेम जुळले आणि त्यांनी लग्न केले. केवळ लग्नच केले असे नाही तर ते टिकलेही आणि दोघांचे संसार सुरळीत सुरु राहिले. आज आपण अशाच बॉलिवूडमधील परफेक्ट जोडप्यांची माहिती घेऊया. अर्थात या कपलपैकी काही जणांचे लग्नापूर्वी दुसऱ्यांशी संबंधही होते पण लग्नानंतर हे कलाकार एकमेकांशी प्रामाणिक राहिलेले आहेत.

बॉबी देओलला आदर्श नवरा म्हटले तर वावगे ठरणार नाही. बॉबीचा पिता धर्मेंद्र आणि भाऊ सनी यांनी लग्नानंतरही बाहेर संबंध जोडले होते. धर्मेंद्र यांनी तर हेमा मालिनीशी लग्न करण्याकरिता धर्मही बदलून घेतला होता. मात्र बॉबीने असे काहीही केले नाही. तान्याबरोबर लग्न झाल्यानंतर बॉबी तिच्याशी एकनिष्ठ राहिला. या दोघांच्या लग्नाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. तान्या एका व्यावसायिकाची मुलगी असून तिचेही बॉबीवर प्रचंड प्रेम आहे. बॉबीला नैराश्यातून बाहेर काढण्याचे काम जसे तान्याने केले तसेच तान्याच्या होम डेकोर व्यवसायाला बॉबीने पूर्णपणे मदत केली. तान्या बाॉलिवूडमध्ये एक लोकप्रिय इंटीरियर डिझायनर आहे. बॉलिवू़डमध्ये असतानाही बॉबीचे कुठल्याही नायिकेबरोबर नाव जोडले गेले नाही. यावरूनच बॉबी आणि तान्यामध्ये किती चांगले संबंध आहेत ते दिसून येते.

सुनील शेट्टीही बॉबीप्रमाणे आदर्श नवरा म्हणण्याचा मोह आवरत नाही. 90 च्या दशकात अॅक्शन हीरो म्हणून बॉलिवूडमध्ये सुनील शेट्टीने प्रवेश केला होता. वडिलांचा हॉटेल व्यवसाय सांभाळतच त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्याच्यावर अनेक मुली फिदा होत्या. बॉलिवू़डमधली एक नायिकाही अगोदरच लग्न झालेल्या सुनील शेट्टीवर फिदा झाली होती आणि त्याच्याशी लग्न करण्याची तिची इच्छा होती. पण सुनील शेट्टीने पत्नी मानासोबत कधीही प्रतारणा केली नाही. त्यांच्या लग्नाला आता जवळ जवळ 30 वर्ष होत आली आहेत. पण कधीही त्या दोघांमध्ये भांडण किंवा वितुष्ट आल्याच्या बातम्या आल्या नाहीत. अथिया आणि अहान अशी दोन मुले या दांपत्याला असून अथियाने चित्रपटसृष्टी नायिका म्हणून प्रवेश केला असून अहानही आता लवकरच नायक म्हणून रुपेरी पडद्यावर येणार आहे.

बॉलिवूडमध्ये खलनायक म्हणून लोकप्रिय असलेल्या सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजूंना मदत करून नायकाचे काम केले आहे. आज त्याला संपूर्ण देशातील नागरिक भाऊ समजतात. कसलीही अडचण असली की त्याच्याकडे धाव घेतात आणि तोसुद्धा त्यांना मदत करतो. देखणा आणि पैसेवाला सोनू सूद पत्नी सोनालीशी एकनिष्ठ आहे. कॉलेजमध्ये असतानाच सोनू आणि सोनाली एकत्र आले. त्यानंतर या दोघांनी लग्नही केले. बॉलिवूडमध्ये असतानाही सोनूचे अजूनपर्यंत तरी कोणाशीही नाव जोडले गेलेले नाही. सोनू आणि सोनालीच्या लग्नाला 25 वर्ष झाली आहेत.

शाहरुख खान आणि गौरी खानचेही या यादीत नाव समाविष्ट करावेच लागेल. अनेक वर्ष गौरीच्या मागे लागून तिचे प्रेम प्राप्त करून शाहरुखने तिच्याशी लग्न केले. चित्रपटात काम करताना अनेक नायिकांशी शाहरुखचे नाव जोडले गेले. एकदा तर शाहरुख-गौरीची जोडी तुटण्याच्या मार्गावर होती. मात्र गौरीने शांतपणे यातून मार्ग काढला आणि शाहरुख मार्गावर आला. या दोघांच्या लग्नाला 30 एक वर्ष झाली आहेत.

आदर्श जोडप्याचा विचार करता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांचेही नाव आठवते. ऐश्वर्या राय विश्वसुंदरी. तिच्याशी लग्न करण्यास अनेक जण इच्छुक होते. सलमान खान आणि ऐश्वर्याच्या प्रेमप्रकरणाबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यानंतर ऐश्वर्याचे विवेक ओबेरॉयबरोबरही प्रेमसंबंध जुळले होते. आणि अखेर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. खरे तर अभिषेक बच्चनचेही करिश्मा कपूरबरोबर लग्न होणार होते परंतु काही कारणाने ते लग्न होऊ शकले नाही. त्यातच त्याची चित्रपट कारकिर्दही म्हणावी तशी बहराला येत नव्हती. असे असतानाही ऐश्वर्याने त्याच्याशी लग्न केले. आजही अभिषेकपेक्षा ऐश्वर्याची लोकप्रियता जास्त आहे. अभिषेककडे आज चित्रपट नसले तरी ऐश्वर्या त्याच्यावर पूर्वीप्रमाणेच प्रेम करते त्यामुळेच अभिषेक आणि ऐश्वर्या हे परफेक्ट कपल म्हटले जाते.

रितेश देशमुखनेही त्याच्या पहिल्याच चित्रपटातील नायिका जेनेलिया डिसूझाबरोबर लग्न केले. बॉलिवूडमधील हे एक आदर्श जोडपे म्हणता येईल. मेड फॉर इच अदर असे जे म्हटले जाते ते या दोघांकडे बघून खरे आहे असे वाटते. दहा वर्ष डेटिंग केल्यानंतर या दोघांनी लग्न केले. या दोघांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या अजून तरी आलेल्या नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER