
ओटीटी प्लॅटफॉर्मवर जसा कचरा दाखवला जातो तसेच खरोखर काही उल्लेखनीय कार्यक्रमही दाखवले जातात. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक निर्माता-दिग्दर्शकांना वेगळे विषय हाताळण्याची आणि नव्या कलाकारांना घेऊन त्यावर वेबसीरीज किंवा सिनेमा बनवण्याची संधी मिळते. काही महिन्यांपूर्वी प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक हंसल मेहता यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला कोट्यावधी रुपयांचा चुना लावणाऱ्या हर्षद मेहताच्या जीवनावर ‘स्कैम 1992- द हर्षद मेहता स्टोरी’ (Scam 1992 – The Harshad Mehta Story) ही वेबसीरीज तयार केली होती. ही वेबसीरीज (Webseries) प्रचंड लोकप्रिय झाली. यात हर्षद मेहताची भूमिका करणारा प्रतीक गांधी एका रात्रीत स्टार झाला होता. रिलायन्ससारख्या कंपनीत इंजीनियर असलेल्या मूळच्या गुजरातच्या प्रतीकला अभिनयाची आवड असल्याने तो दिवसा नोकरी आणि रात्री नाटकांमध्ये काम करीत असे. हिंदी आणि गुजराती भाषेतील अनेक नामवंत दिग्दर्शकांच्या हाताखाली अनेक यशस्वी नाटकांमध्ये त्याने काम केले होते. हंसत मेहतांच्या या वेबसीरीजने त्याच्यासाठी बॉलिवुडचे दरवाजे उघडले आहेत.
प्रतीककडे सध्या काही निर्मात्यांची नजर वळली असून त्याला सिनेमाच्या ऑफर दिल्या जात आहेत. मालिकांचा यशस्वी दिग्दर्शक हार्दिक गज्जरने प्रतीकला घेऊन ‘अतिथि भूतो भव’ सिनेमाला सुरुवात केली असून शुक्रवारपासून मथुरेत या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवातही करण्यात आली आहे. या सिनेमात प्रतीक प्रख्यात अभिनेते जॅकी श्रॉफसोबत (Jackie Shroff) काम करणार असून शर्मिन सहगल त्याच्या नायिकेची भूमिका साकरणार आहे.
हार्दिक गज्जरचा प्रतीकसोबत हा दुसरा सिनेमा आहे. या दोघांनी ‘रावण लीला’ सिनेमा नुकताच पूर्ण केला आहे. या सिनेमात प्रतीकसोबत ऐंद्रिता रे, अभिमन्यु सिंह, राजेश शर्मा, फ्लोरा सैनी, अंकुर भाटिया, राजेंद्र गुप्ता या कलाकारांनी काम केलेले आहे. याशिवाय हार्दिक आणि प्रतीकने एक गुजराती सिनेमा ‘वाहलम जाओ ने’चीही योजना तयार केलेली आहे. ‘अतिथि भूतो भव’ हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमाची निर्मिती जयंतीलाल गाडा करीत आहे. ‘रावण लीला’ची निर्मितीही त्यांनीच केलेली आहे.
जॅकी श्रॉफसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने प्रतीक खूपच आनंदी आहे. प्रतीक म्हणतो, दिग्दर्शक हार्दिक गज्जरसोबत मी पुन्हा एकदा काम करीत आहे. हा सिनेमा एक अनोखी प्रेम कथा आहे. हा सिनेमा करताना मला खूप आनंद होत आहे आणि याचे कारण आहे जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल यात शंका नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला