सूर्यकांत दळवींची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास कदम

Ramdas-Kadam-Suryakant-Dalvi

मुंबई : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर संपन्न होणार आहेत. अशातच कोकणात शिवसेनेतील अंतर्गत वाद समोर आला आहे. शिवसेनेचे दापोली विधानसभेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यात कलगीतुरा रंगला असल्याच दिसून येत आहे. दोन्ही नेते एकाच पक्षातले असून देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सूर्यकांत दळवी यांनी मंत्री रामदास कदम हे जादू टोणा करत आहेत. त्यासाठी ते बंगाली बाबाची मदत घेत असल्याचा आरोप केला होता. यावर आता रामदास कदम यांनी उत्तर दिले आहे.

रामदास कदम म्हणाले की, सूर्यकांत दळवी यांनी माझी बदनामी केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत मी जादूटोणा करत असल्याचे गंभीर आरोप केले. त्यांचे हे विधान मी गांभीर्याने घेतले असून लवकरच त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्या सूर्यकांत दळवी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची मागणी आपण पक्ष श्रेष्टीकडे करणार आहे. तसेच कावीळ झालेल्या माणसाला जग नेहमी पिवळे दिसते. त्याप्रमाणे सुर्यकांत दळवी यांचे झाले आहे. त्यांना सध्या सगळीकडे रामदास कदम दिसत आहेत. माझ्यावर खोटे आरोप केल्याबद्दल दळवी यांच्यावर आपण १० कोटींचा दावा दाखल करणार असल्याची माहितीही कदम यांनी यावेळी दिली.