‘जामिनावर सोडल्यास कायद्याचा अभ्यास करून वकिली करीन’

Bombay HC
  • ‘इसिस’ खटल्यातील आरोपीचे हायकोर्टात प्रतिपादन

मुंबई : ‘मला जामिनावर सोडल्यास मी कायद्याचा अभ्यास करून वकिली करीन’, असे उत्तर  इराकला जाऊन ‘इस्लामिक स्टेट’साठी (ISIS) लढल्याचा आरोप असलेल्या आरीब माजीद या कल्याण येथील २७ वर्षांच्या आरोपीने उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना केले. सिव्हिल इंजिनियरिंगच्या पदवी अभ्यासक्रमात शिकत असताना वयाच्या २१ व्या वर्षी तो इतर तिघांसोबत २४ मे, २०१४ रोजी इराकला गेला. सहा महिन्यांनी तेथून परत आल्यावर मुंबई विमानतळावरच त्याला अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपासी यंत्रणेने (NIA) बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (UAPA) दाखल केलेला खटला सध्या सुरु आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्याला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला.

त्याविरुद्ध ‘एनआयए’ने केलेल्या अपिलावर उच्च न्यायालयात न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ‘एनआयए’साठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. विशेष न्यायालयातील खटल्यात स्वत:च स्वत:चा बचाव करणाºया आरीबने उच्च न्यायालयातही स्वत: युक्तिवाद केला. त्यात  न्यायमूर्तींनी आरीबला अनेक प्रश्न विचारले व त्याने त्या प्रश्नांची हुशारीने उत्तरे दिली.

मी इराकला जाऊन दहशतवादी कृत्ये केली, असे अभियोग पक्ष म्हणतो. पण त्याला त्यांच्याकडे काही पुरावा नाही, असे सांगत आरीब म्हणाला की, मी ‘इसिस’साठी कुठे व कसा लढलो? त्यासाठी कोणती शस्त्रे वापरली? या प्रश्नांची उत्तरे त्यांंच्याकडे नाहीत. मी इराकला गेलो म्हणजे तेथे मी काही तरी दहशतवादी कृत्य केले असणारच, असे न्यायालयाने गृहित धरावे, अशी अभियोग पक्षाची अपेक्षा आहे.

यावरून न्या. पितळे व आरीब यांच्यात काही मार्मिक प्रश्नोत्तरे झाली, त्यातील काही अशी:

  • न्या. पितळे: लढण्यासाठी नव्हे तर मग तुम्ही तेथे कशासाठी गेला होतात?
  • आरीब: त्यावेळी मी २१ वर्षांचा होतो. तेथील (इराकमधील) लोकांची परिस्थिती पाहून माझे मन हेलावून गेले, म्हणून मी तेथे गेलो. तेथे जाऊन मी लोकांना मदत करत होतो.
  • न्या. पितळे: वयाच्या २१ व्या वर्षी शिक्षण अर्धवट सोडून तुम्ही लोकांना मदत करायला तिकडे गेलात? इथेही तुमच्या अवती त्रासलेले लोक खूप असतील. शिवाय तुम्ही जे केलेत त्याने तुमच्या आई-वडिलांना, कुटुंबाला किती त्रास झाला असेल, याची तुम्ही कधी कल्पना तरी केलीत?
  • आरीब: गेली सहा वर्षे (तुरुंगात राहून) मी स्वत:ही खूप सोसले आहे. मी ज्यांच्यासाठी परत आलो त्यांना मला भेटूही दिले जात नाही.

आरीबने युक्तिवाद करताना सर्वोच्च न्यायालयाच्या अगदी तीन दिवसांपूर्वीच्या ताज्या निकालांचेही दाखले दिले होते. शिवाय तो उच्चशिक्षित कुटुंबातील आहे, याचीही न्यायालयास कल्पना होती. (आरीबचे वडील व दोन बहिणी डॉक्टर आहेत) हे लक्षात घेऊन न्या. पितळे यांनी त्याला विचारले, तुम्हाला जामीनावर सोडले तर तुम्ही काय करणार? यावर आरीबने ‘वकिली करीन’, असे उत्तर दिले.

न्या. पितळे आरीबला म्हणाले, २१ व्या वर्षी तुम्ही तुमच्या क्षमतांचा (चांगल्या कामांसाठी) उपयोग केला असतात तर त्याने तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या देशालाही त्यामुळे किती आनंद झाला असता!

यावर आरीब उत्तरला: त्याचाच तर मलाही पश्चात्ताप होतोय. न्यायाधीश महाशय, मला पश्चात्ताप होत नाही, असे नाही. मी जुकीचे केले ते मी मुळीच नाकारणार नाही. पण त्यांनी ( अभियोग पक्षाने) माझ्यावर जे आरोप केले आहेत, ते मात्र निखालस खोटे आहेत.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सिंग यांनी हातात बंदूक घेतलेला आरीबचा फोटो न्यायालयास दाखवला. त्यावर आरीब म्हणाला, तो देश त्यावेळी जणू युद्धभूमी होतो. हातात बंदूका घेतलेली १० वर्षांची मुलेली त्यावेळी तेथे पाहायला मिळाली असती. बंदूक हातात घेऊन मी फोटो काढून घेतला याचा अर्त मी त्या बुदुकीचा वापर केला असा होत नाही.

आपल्याविरुद्धचा खटला लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेही आपल्याला जामीन मिळायला हवा, असे सांगताना आरीब म्हणाला, आत्तापर्यंत अभियोग पक्षाचे फक्त ४९ साक्षीदार तपासून झाले आहेत. अजूनही १०७ साक्षीदार बाकी आहेत. शिवाय ‘यूएपीए’ खेरीज (आता रद्द झालेल्या) ‘टाडा’ व ‘पोटा’ कायद्याखालील खटलेही त्याच न्यायालयात आहेत. ते इतर खटले बाजूला ठेवून फक्त माझा खटला लवकर ऐकला जाईल, अशी अपेक्षा ठेवणेही चूक आहे. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यावर खंडपीठाने ‘एनआयए’च्या अपिलावर येत्या २३ फेब्रुवारी रोजी निकाल दिला जाईल, असे सांगितले.

अजित  गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER