‘मी राष्ट्र्वादीतच राहणार !’ फडणवीसांच्या भेटीनंतर नाथाभाऊंचे स्पष्टीकरण

Devendra Fadnavis and Eknath Khadse

जळगाव : दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपमधून (BJP) राष्ट्रवादीत (NCP) गेलेल्या एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) घरी भेट दिली होती. त्यावेळी एकनाथ खडसे मुंबईला होते. त्यात खडसेंनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यामुळं राजकीय क्षेत्रात चर्चा रंगल्या होत्या. मात्र मुक्ताईनगरमध्ये परतल्यानंतर लगेचच खडसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कोणत्याही राजकीय चर्चांना अर्थ नाही. मी आता कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी सोडणार नाही. राष्ट्रवादीत मला मोठा आधार मिळाला, असे स्पष्टीकरण देत काही लोकांनी भाजपमध्ये असताना मला खूप छळलं, असं म्हणत खडसेंनी अद्याप जुन्या कोणत्याही गोष्टी विसरल्या नसल्याचे संकेतही देऊन टाकले. मुक्ताईनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी विविध विषयांवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, आता कुठल्याही परिस्थितीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार नाही. भाजपमधील काही विशिष्ट लोकांनी माझा भरपूर छळ केला. माझ्यावरती गुन्हे दाखल केले. दाऊदच्या बायकोशी संबंध असल्याचे सांगत चौकश्यांचा ससेमिरा लावला. अँटी करप्शनच्या चौकशा केल्या, अनेक खोटेनाटे खटले दाखल करण्यात आले. एवढंच नाही तर सत्तेच्या लालसेपोटी एकनाथ खडसे आडवा येऊ शकतो म्हणून माझा छळ केला गेला, असे आरोप खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं आहे. घटनेमध्ये ओबीसींना ५० टक्के आरक्षण मिळावे अशी तरतूद केलेली आहे. पण आरक्षण रद्द झालं हा ओबीसी समाजावर झालेला अन्याय आहे. त्यामुळं राज्य सरकारनं ओबीसींना न्याय देण्यासाठी समिती गठित केली आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या दौऱ्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्याला मदत मिळवून देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं आहे. पण देवेंद्रजींनी या ठिकाणी आम्ही मदत मिळवून देऊ असं सांगितलं आहे. आता ते राज्य सरकारकडे मदत मागणार आहेत. पण केंद्रानंही मदत करायला हवी. हा वादळाचा भाग आहे. तौक्तेसाठी पंतप्रधानांनी गुजरातला मदत केली. पण अद्याप महाराष्ट्राचा दौरा केला नाही. वादळाने रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं केंद्रानं ताबडतोब मदत करण्याची मागणी खडसेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button