‘मी कोर्टात जाणार नाही, तिथे न्याय मिळत नाही’ – रंजन गोगोई

Ranjan-Gogoi

मुंबई :- देशाची न्यायव्यवस्था ही जीर्ण झाली आहे. तिथे जाणे म्हणजे पश्चाताप करून घेण्यासारखे आहे, असे वक्तव्य माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांनी खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले.

गोगोई यांनी त्यांच्यावरील लैंगिक छळाचा निवाडा केला, असा आरोप तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केला आहे. या आरोपाला कोर्टात आव्हान देणार का? असा प्रश्न गोगोई यांना विचारला. यावेळी त्यांनी देशातील एकंदरीत न्यायव्यवस्थेबाबत भाष्य केले. ते म्हणले की, “देशाची न्यायव्यवस्था ही जीर्ण झाली आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला पश्चाताप होतो. तिथे तुम्ही फक्त मळलेले कपडे धुत बसता. कॉर्पोरेट कंपन्यांना कोर्टात जाणे परवडते. संपत्तीच्या वादात बरेच लोक ट्रायल कोर्टात केस बंद करतात. बाकी उच्च न्यायालयात जातात. सर्वोच्च न्यायालयात कोण जाते?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

पुढे गोगोई म्हणाले की, ‘महिला खासदाराला या प्रकरणातल्या गोष्टी माहिती नाही. त्यावेळी ते प्रकरण न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्याकडे दिले होते. त्यांनी या प्रकरणात चौकशी समिती नियुक्त केली होती. आरोप करण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करायला हवी. तथ्यांची पडताळणी करण्यापूर्वीच लोकं आरोप करतात. या देशातली ही मोठी कमतरता आहे, असे गोगोई यांनी स्पष्ट केले.

कोरोना वर्षात ताण वाढला!

“आपल्या देशाला ५ लाख कोटींची अर्थव्यवस्था हवी आहे. पण आपली न्यायव्यवस्था ही जीर्ण झालेली आहे. २०२० या कोरोनाच्या वर्षात कनिष्ठ न्यायालयात ६० लाख, उच्च न्यायालयात ३ लाख तर सर्वोच्च न्यायालयात ७ हजार खटल्यांची भर पडली आहे. सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे न्यायाधीशांची नेमणूक करता येत नाही. या कामासाठी पूर्णवेळ कटिबद्ध असणे आवश्यक आहे. आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास काम करावे लागते. आपल्याकडे अनेक चांगले न्यायमूर्ती आहेत. पूर्ण वेळ काम करूनही काही गोष्टी नीट होत नाहीत. व्यवस्था खराब असते, त्यावेळी चांगले व्यक्तीदेखील प्रभावहीन ठरतात.” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

“अयोध्या आणि राफेल प्रकरणाचा निकाल आणि राज्यसभा खासदारकीचा काही संबंध नाही. सौदा करायचा असता, तर राज्यसभेच्या जागेवर कुणी समाधान मानले असते का? राज्यसभेसाठी मी एक रुपयादेखील मानधन घेत नाही.” असे गोगोई यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER