पुण्यात एका मिशनसाठी केंद्राने मला पाठवलं ते पुर्ण करूनच जाईन – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

पुणे :- पुण्यात मी एका मिशनसाठी आलो आहे. केंद्राने मला पुण्यात एका मिशनसाठी पाठवलं आहे. हे मिशन संपताच मी परत कोल्हापूरला जाईल, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी आज (26 डिसेंबर) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात केलेल्या आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलंय.

चंद्रकांत पाटील यांनी मी कोल्हापूरला परत जाईन असं विधान केलं होतं. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली होती. त्यामुळे चंद्रकांतदादांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना फैलावर घेत प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या वाक्याने कुणी हुरळूनही जाऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये. मी कुठेच जाणार नाही. मी इथेच राहणार आहे. माझ्या त्या वाक्याचा शब्दश: कुणी अर्थ घेऊ नये, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. काल गिरीश बापट यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावर मी पुण्यात राह्यला आलो नाही, कोल्हापूरला परत जाईन असं वक्तव्य केलं होतं. तसंही माणसाला कुठं तरी सेटल व्हावंच लागतं. आयुष्याच्या संध्याकाळी मीही कोल्हापूरला सेटल होणार आहे. याचा अर्थ आजच सेटल होणार असं नाही. कधी सेटल होईल सांगता येणार नाही. पाच… दहा… पंधरा… वीस… कितीही वर्षे लागू शकतात, असंही ते म्हणाले.

माझ्या पक्षाने मला एक मिशन दिलं होतं. त्यामुळे मी इथे आलो. मिशन पूर्ण झालं की परत कोल्हापूरला जाणार, असं सांगतानाच हे मिशन काय आहे हे तुम्हाला कशाला सांगू? असंही ते पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. माझं मिशन व्यवहारात दिसत आहे. विरोधक बाहेरचे आहेत. त्यांना माझं मिशन दिसत नाही, दिसणार नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा पुण्यातून गेलेले बरे असं त्यांना वाटतं, असा चिमटाही त्यांनी काढला. कोथरुड विधानसभा निवडणूक लढणं हे मिशन नव्हतं. मिशन दुसरं आहे. पण या शहरात पाय रोवण्यासाठी लोकप्रतिनिधी होणं गरजेचं होतं. त्यामुळे निवडणूक लढलो, असंही ते म्हणाले.

पाटील म्हणाले, माझी बॅग भरलेलीच आहे. आम्हाला एक ठिकाण नसतं. पण सांगेल त्या ठिकाणी जावं लागतं, असं सांगतानाच मी राज्याचा अध्यक्ष आहे. मला एखाद्या जिल्ह्याचा किंवा भागाचा विचार करता येत नाही. त्यामुळे मी पुण्यात राहिलो काय? कोल्हापूरला थांबलो काय? आणि नागपुरात राहिलो काय? काहीच फरक पडत नाही, असंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांनंतर तुमचं स्थान काय राहील, अजित पवारांनी त्याचा विचार करावा – चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER