भाजपने संधी दिल्यावर मीच पुण्याचा भावी खासदार : संजय काकडे

पुणे : भाजपाचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील जागा लढवणार असल्याची माहिती दिली . दरम्यान माझे मेरिट पाहता भाजपा मलाच संधी देईल आणि मीच पुण्याचा भावी खासदार होणार असल्याचे वक्तव्य संजय काकडे यांनी केले आहे .

संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यात पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यात संजय काकडे अनुपस्थित होते. यावर पुण्याच्या कार्यक्रमाला मला बोलवलं नाही म्हणून गेलो नाही, असे काकडे यांनी सांगितले.

 ही बातमी पण वाचा : पुण्यातील मोदींच्या कार्यक्रमाला खा. काकडेंची अनुपस्थिती, चर्चेचा विषय

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्याच्या निकालानंतर संजय काकडे यांनी धर्म, राममंदिर, शहरांची नामकरणे, पुतळे आदींचे राजकारण सोडून भाजपने नरेंद्र मोदींच्या विकासाच्या अजेंड्याच्या मार्गावर चालावे अशा शब्दांत भाजपला घरचा आहेर दिला होता .

पुण्यातील वाडेश्वर कट्टयावर पुण्याचा भावी खासदार कोण ? यावर चर्चासत्राचे योजना करण्यात आले होते . यावेळी संजय काकडे, मोहन जोशी, बाबू वागसकर, राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आदी नेतेमंडळी उपस्थित होती. मी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून पुण्याची जागा लढवणार आहे. माझा मेरिट पाहता पक्ष मला संधी देईल आणि मी आता पर्यंत दीड लाख सभासद केले आहे. मी आता जनतेमधून संसदेत जाईल , असे संजय काकडे म्हणाले.