मी सुमितला दत्तक घेणार होते

Chimayi & Sumit Raghavna

मी सुमित राघवनला दत्तक घेणार होते पण तसं काही झालं नाही आणि मग आम्ही लग्नच केलं. अभिनेत्री चिन्मयी सुमितच्या या प्रतिक्रियेवर तुमच्या भुवया उंचावल्या असतील ना…. चिन्मयी असं का म्हणाली असेल हा प्रश्नही डोकावला असेल. तू आणि सुमित यांच्यामध्ये वयाचे किती अंतर आहे आणि तुम्ही सुमित पेक्षा इतक्या मोठ्या कशा दिसता असा प्रश्न एकाच चाहत्याने विचारून भंडावून सोडल्यानंतर वैतागून चिन्मयीने दिलेले हे उत्तर आहे.

इंडस्ट्रीमध्ये अनेक जोड्या हा नेहमीच चर्चेत असतात. मेड फॉर इच अदर असलेल्या अशा अनेक जोड्यांपैकी सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांची जोडी देखील आहे. खरे तर या दोघांनी खूप कमी एकत्र काम केलं असलं तरी कपल म्हणून ही दोघं नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. काही जणांना तारुण्याचं काही वेगळेच रहस्य मिळालेलं असतं आणि त्यामध्ये सुमित राघवन हादेखील आहे. तो ज्या वयाचा आहे त्यापेक्षा किमान दहा वर्षे तरी लहान असल्यासारखा दिसतो. सुमितनेही याबाबत एका मुलाखतीत सांगितलं होतं की ही तरुण दिसण्याची देणगी त्याला अनुवंशिकतेने मिळाली आहे. त्याचे वडील आणि आजोबा देखील वयापेक्षा खूप तरुण दिसत होते. चिन्मयी सांगते की आम्ही कुठेही जातो तिथे आम्हाला हा प्रश्न किंवा ही उत्सुकता नेहमीच जाणवते की मी आणि सुमित यांच्या दोघांमध्ये मी वयाने मोठी दिसते. अनेक जण माझे वय विचारण्याचा प्रयत्न करतात पण मी मात्र त्यांना ताकास तूर लागू देत नाही.

एका रेडिओ चॅनेल साठी लाईव्ह मुलाखत करत असताना देखील चिन्मयीला चाहत्याने हा प्रश्न विचारला . पुन्हा एकदा या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न चिन्मयीला करावा लागणार होता. पण या मुलाखतीचा बाज विनोदी ढंगाचा असल्यामुळे चाहत्यांकडून येणार्‍या प्रश्नांना फनी उत्तर द्यायची होती. त्यामुळे हा प्रश्न चिन्मयीला तेवढ्यासाठी आवडला की आता हा प्रश्न तिला इतक्यांदा ऐकायला मिळतो त्यामुळे आता तिच्या लेखी प्रश्न हास्यास्पद झालेला आहे. त्यामुळे चिन्मयीला खरे तर हा प्रश्न ऐकल्यानंतर उत्तर देण्यासाठी मजा येणार हे समजून चुकलं होतं. आणि समोर मुलाखत घेण्यासाठी अभिनेता स्वप्नील जोशी होता.

तुमच्यापेक्षा सुमित लहान दिसतो आणि तुम्ही खूप मोठ्या दिसता, असे का ?या प्रश्नाचं असं काहीतरी उत्तर द्यायचं ठरवलं आणि तेव्हा ती म्हणाली खरं सांगू का, मी जेव्हा सुमितला भेटले तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की याला दत्तक घ्यावं आणि मी तयारी देखील केली या गोष्टीची की आता मी सुमितला दत्तक घेणार आणि घरी नेणार .

पण सुमित मला असं म्हणाला की तुला दत्तक घेतलं तर मला तुला आई असं म्हणावं लागेल आणि मी काही तुला काही आई म्हणणार नाही. मग आम्ही ठरवलं की आपण दोघांनी लग्न करावं आणि म्हणून आम्ही नवरा-बायको झालो. खरतर या उत्तरात असलेला खोचकपणा त्या प्रश्न विचारणार्‍याला समजला की नाही हे माहीत नाही मात्र यानिमित्ताने
चिन्मयीला हा प्रश्न विचारण्याचा विचार करत असणाऱ्या चाहत्यांना मात्र ब्रेक मिळाला असणार हे नक्की.

चिन्मयी सध्या जीव झाला येडा पिसा या मालिकेत आत्याबाई हा आमदारीण बाईची भूमिका करताना दिसत आहे. या मालिकेतील चिन्मयीच्या लूकचीही खूप चर्चा आहे. मोजके पण नेटके काम करण्यावर भर देणाऱ्या चिन्मयीने खरंतर उमेदीची वर्षे मुलांच्या संगोपनासाठी दिली. ती सांगते, सुमितही त्याच्या नाटक, मालिकांमध्ये गुंतला होता आणि मला माझ्या मुलांच्या वाढीचे टप्पे अनुभवायचे होते. त्यामुळेच चिन्मयी मधली काही वर्षे छोट्या, मोठ्या पडदयापासून काहीशी लांब होती. ज्वालामुखी या नाटकाच्या निमित्ताने चिन्मयी आणि सुमितची भेट झाली. कोण प्रपोज करणार याची वाट बघण्यातच पहिली काही वर्षे अशीच नुसती फिरण्यात गेली आणि शेवटी कुणीच कुणाला प्रपोज न करता काय कळायचे ते दोघांनाही कळले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER