मीसुद्धा विरोधी पक्षनेता होतो, पण असा खेळ कधी खेळला नाही; खडसेंचा फडणवीसांना टोला

Eknath Khadse - Devendra Fadnavis

मुंबई : केंद्र सरकारने वेळीच रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यातबंदी केली असती तर आपल्याला साठा उपलब्ध झाला असता. परंतु आपल्याकडे टंचाई असताना केंद्राने निर्यात सुरू ठेवली. म्हणूनच ही परिस्थिती उद्भवली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला. खडसेंनी यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ‘विरोधी पक्षनेता म्हणूनही मीसुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्र्यामांजराचा खेळ कधी खेळला नाही.’ असा टोला त्यांनी हाणला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज रविवारी दुपारी जिल्हा कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या ठिकाणी उपस्थिती लावल्यानंतर खडसे हे माध्यमांशी बोलले. ‘राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे. केंद्र सरकारने वेळीच रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यातबंदी केली असती, तर आज साठा उपलब्ध झाला असता. केंद्राने वेळीच निर्यातबंदी का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आता निर्यातबंदी झाली आहे. त्यामुळे आता लवकरच साठा उपलब्ध होईल. तसेच केंद्र सरकारने कोरोनाच्या कठीण काळात राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.

“महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकट आले अथवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला, मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे. विरोधी पक्षनेता म्हणूनही मीसुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्र्यामांजराचा खेळ कधी खेळला नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही. फडणवीस हे सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडेल अशा वल्गना करतात. आपले कार्यकर्ते टिकून राहावेत म्हणून फडणवीस हा आटापिटा करत आहेत. मला वाटले फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी आतापर्यंत चार-पाच वेळा सरकार पडणार म्हणून सांगितले. आता त्यांनी पुन्हा २ तारीख दिली आहे. मी २ तारखेची वाट पाहतो आहे. जर २ तारखेला सरकार पडले नाही तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेन, असा टोला खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button