‘‘संगणकात आक्षेपार्ह दस्तऐवज ‘प्लांट’ करून मला आरोपी केले’’

Bombay High Court - Rona Wilson
  • भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपीची याचिका

मुंबई : मुख्यत: ज्या १० दस्तऐवजांच्या आधारे मला आरोपी करून इतके दिवस जामिनाविना तुरुंगात डांबण्यात आले आहे ते दस्तऐवज माझ्या संगणकात दुसऱ्या कोणी तरी मॅलवेअर वापरून ‘प्लांट’ केलेले आहेत, असा धक्कादायक दावा करणारी याचिका भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणातील आरोपी रोना विल्सन यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल केली आहे.

हिंसाचारास जबाबदार असलेल्या खर्‍या आरोपींना बाजूला ठेवून मला आणि सहआरोपी प्रा. वरावरा राव यांना या प्रकरणात कपटाने गोवण्याचे हे कारस्थान कोणी केले याचा छडा लावण्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखालील व डिजिटल फॉरेन्सिक विश्लेषणातील तज्ज्ञांचा समावेश असलेले ‘विशेष तपास पथक (Special Investigation Team-SIT) नेमून तपास केला जावा, अशीही विल्सन यांची मागणी आहे.

आपल्यावरील आरोप धादांत खोटे असल्याने आपल्याला तत्काळ जामिनावर सोडण्यात यावे, विशेष न्यायालयापुढे सुरू असलेल्या खटल्याला स्थगिती दिली जावी आणि हे कारस्थान तपासाअंती सिद्ध झाल्यावर आपल्यावरील खटला पूर्णपणे रद्द केला जावा, अशीही याचिकेत विनंती आहे.

विल्सन यांच्या जप्त केलेल्या संगणकात हे दस्तऐवज विल्सन यांनी तयार केल्याचे व इतरांना मेलने पाठविल्याचे पुरावे आहेत, असा दावा तपास करणार्‍या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency-NIA) जप्त केलेल्या या कथित आक्षेपार्ह दस्तऐवजांच्या ‘क्लोन्ड’ प्रती व संगणक विल्सन यांना वर्षभराने परत देण्यात आला.

विल्सन याचिकेत म्हणतात की, माझा संगणक व तपास यंत्रणेने दिलेल्या ‘क्लोन्ड’ प्रती यांचे तज्ज्ञांकडून ‘डिजिटल फॉरेन्सिक अ‍ॅनालिसिस’ करून घेण्याची विनंती माझ्या वकिलांनी ‘अमेरिकन बार असोसिएसन’ला केली. त्यानुसार मे. अर्सेनस कन्सल्टिंग या तज्ज्ञ फर्मकडून ही तपासणी करून घेण्यात आली. पोलिसांनी जप्त करण्याच्या सुमारे २२ महिने आधीपासून आपला संगणक मॅलवअर वापरून ‘कॉम्प्रमाईज’ करण्यात आला होता व याच काळात हे १० आक्षपार्ह दस्तऐवज कोणी तरी बाहेरून आपल्या संगणकात ‘प्लांट’ केले, असा अहवाल अर्सेनिक कन्सल्टिंग या फर्मने दिला आहे.

याचिका म्हणते की, डॉ. वरावरा राव यांचा ई-मेल अकाउंट हॅक करून त्यावरून आधी आपल्याला अनेक ई-मेल पाठविले गेले. याच ई-मेलमधून ‘नेटवायर’ नावाच्या मॅलवेअरचा व्हायरस पाठविण्यात आला होता. ई-मेल उघडल्यावर हा व्हायरस आपल्या संगणकात शिरला व त्याने हे १० आक्षेपार्ह दस्तऐवज आपल्या संगणकात ‘प्लांट’ केले.

याचिकेनुसार फॉरेन्सिक डिजिटल अ‍ॅनेलिसिसमधून असेही दिसून आले की, विल्सन यांच्या संगणकात मायक्रोसॉफ्ट वर्डचे २००७ चे व्हर्जन आहे. परंतु हे सर्व आक्षेपार्ह दस्तऐवज मायक्रोसॉफ्ट वर्डची २०१० व २०१३ ची व्हर्जन वापरून तयार केलेले आहेत.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER