अभिनयासोबत जोडधंदा करायचा असतो

अभिनयासोबत जोडधंदा करायचा असतो

अभिनयाच्या सोबतीने आज अनेक कलाकार विविध गोष्टीत रमताना दिसतात. एवढ्या ग्लॅमरस क्षेत्रात आपली वेगळी ओळख टिकवण्यासाठी किंवा आपल्या कलेच्या जोरावर काहीतरी अफलातून करण्यासाठी अनेक कलाकार हे नवनवीन प्रयोग करताना दिसतात. इंडस्ट्री कोणतीही असो तिकडे आपलं वेगळेपण जपता आलं पाहिजे म्हणून आजवर अनेक कलाकारांनी अभिनयाच्या सोबतीने लेखन , दिग्दर्शन केलं. पण या पलीकडे जाऊन व्यवसाय करणारे अनेक कलाकार हे मराठी इंडस्ट्रीत बघायला मिळत आहेत. म्हणजे, अलिकडे अभिनय हे बेभरवशाचं क्षेत्र असल्यामुळे आता त्याला सोबत जोडव्यवसाय करण्याकडे अनेक अभिनेत्री, कलाकारांचा कल दिसतो.

नुकतंच अभिनेत्री ” सई ताम्हणकर ” हिने स्वतःचा एक साडी ब्रँड लाँच केला. सई ही तिच्या अदांनी आणि लुक्सने नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सईने ” द सारी स्टोरी ” हा साडीचा खास ब्रँड लाँच केला. प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात साडी महत्त्वाची वाटते अगदी पैठणीपासून काठा-पदराच्या साड्यांपर्यंत अनेक साड्या आपल्याकडे बघायला मिळतात. सई आणि तिच्या मैत्रीणीने सोबत येऊन हा खास ब्रँड लाँच केला आहे. विविध रंगांच्या छटा त्यावर बारकाईने केलेलं सुंदर काम आणि त्यातून घडणारी ही साडी आहे. सईने या ब्रँडअंतर्गत नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अनेक कलाकार मंडळीनी तिच्या या खास व्यवसायाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी इंडस्ट्रीत सोबत अभिनय करून दोन घट्ट जीवाभावाच्या मैत्रीणीनी सोबत येऊन एक खास फॅशन ब्रँड लाँच केला आणि तो म्हणजे ” तेजाज्ञा ” अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि अभिज्ञा भावे या दोन अभिनेत्रीनी सोबत येऊन या ब्रँडची निर्मिती केली. तेजस्विनी या नावातला तेजा आणि अभिज्ञा या नावातला ज्ञा घेऊन ‘तेजाज्ञा’ बनला आहे. जुन्या काळात ” खण ” हा कपड्याचा प्रकार वापरला जायचा याच खणाला एक पारंपरिक टच देऊन त्यातून काहीतरी भन्नाट तयार करण्याच्या दृष्टीने हा खास ब्रँड निर्माण झाला. विस्मरणात गेलेल्या खणाच्या कापडापासून सुंदर तितक्याच आखिव रेखीव साड्या , आऊटफिट्स , कुर्ते आदी अनेक प्रकार या तेजाज्ञामध्ये येतात.

अभिनय , दिग्दर्शन आणि व्यावसायिका ही तिन्ही क्षेत्र तितकीच आपलेपणाने जपणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर- वानखेडे. मेकअप टुटोरियल पासून ते अगदी इंस्टाग्राम च्या मजेशीर रिल्स व्हिडिओमधून नेहमीच प्रेक्षकांच मनसोक्त मनोरंजन ती करते आहे. पण याच सोबतीने कल्पक डिझाईन्सने एक क्लोथिंग आणि ज्वेलरी ब्रँडची निर्मिती तिने केली आहे. आपल्या जुळ्या मुलीचं संगोपन करून त्यांच्या नावाचा खास फॅशन ब्रँड घेऊन तिने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलंय.

रंगेबेरंगी कपडे घालायला कोणाला आवडत नाही म्हणून अश्याच कलरफुल ब्रँडची संस्थापिका आहे अभिनेत्री आरती वाडगबाळकर. “कलरछाप” हा रंगीत क्लोथिंग ब्रँड तिने काही वर्षांपूर्वी लाँच केला. फॅन्सी पण तितक्याच सुंदर रंगसंगती असलेल्या साड्या, कुर्ती, वेस्टर्न आऊटफिट्स असं भन्नाट कलेक्शन कलरछापच्या वेबसाईटवर बघायला मिळेल. या ब्रँडसाठी आजवर अनेक कलाकार मंडळीनी शूट केलंय.

आपल्यात असलेली कला जोपासत तिला व्यवसायाचा एक अनोखा टच देऊन आज या अनेक अभिनेत्रीनी हे व्यवसाय सुरू केले आहेत. आवडीचं रूपांतर व्यवसायात करून आज त्यांचे हे ब्रँड सगळ्यांना परिचयाचे झाले आहेत. खरंतर यापूर्वी अभिनयासोबत आपणही असा जोडधंदा करावा असं अनेकांच्या लक्षात आलं नव्हतं. पण या नव्या दमाच्या नायिकांनी मात्र आपल्याला असलेलं हे ग्लॅमर कॅश केलं आहे. आता हा झाला नायिकांचा मामला. पण आपल्याकडचे पुरुष कलाकारही काही मागे नाहीये बर का. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो शंतनु मोघे आणि प्रिया मराठे यांचा. या दोघांचं एक मस्त हॉटेल आहे मीरा भाईंदर भागात. तिथे मस्त फास्ट फूड मिळतं. अनेक कलाकार तिथे त्या फूडचा आस्वाद घ्यायला जातात. तर काही दिवसांपूर्वी शशांक केतकरनेही पुण्यात एक रेस्टॉरंट चालवायला घेतलं होतं. पण कालांतराने इकडे कामात व्यग्र झाल्यामुळे त्याला ते हॉटेल बंद करावं लागलं. अनेक छोट्या मोठ्या कलाकारांनी वेगवेगळे व्यावसाय जपले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER