जनतेचे दुःख मला समजते, वेदनाही जाणवतात; मोदींचा जनतेला धीर देण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वाटपानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज जनतेला संबोधित केले. कोरोनाच्या साथीबद्दल बोलले. अनेक लोक कोरोनाच्या संकटातून जात आहेत. लोक ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहेत, त्याची जाणीव मलादेखील आहे. जनतेचे दुःख मला समजते, त्यांच्या वेदना मलाही जाणवतात, असा त्यांनी देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, देशातल्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. १०० वर्षांनंतर अशी भयानक साथीच्या आजाराची परिस्थिती जगावर उद्भवली आहे. आपल्यासमोर एक अदृश्य शत्रू आहे. भारत अजूनही हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हरणार नाहीत, असं नरेंद्र मोदी म्हणालेत. नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. लस घेतली तरीही मास्क वापरणे बंधनकारक आहे, असे बजावले.

देशात आतापर्यंत १८ कोटी लोकांनी लस घेतली आहे, अशी माहिती दिली. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आज देशभरातील ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सने हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही खासदार या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सने उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांना ईद आणि अक्षयतृतीयाच्या शुभेच्छा दिल्या.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button