शपथेवर सांगतो, सारं काही आहे…

Doctor - Remdesivir - Editorial

Shailendra Paranjapeपुण्यातल्या डॉक्टरांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली आणि रेमडेसिवीर मिळत नाही तसेच प्राणवायूच्या कमतरतेमुळे रुग्णांसाठी ते प्राणघातक ठरू शकते, अशी कारणे सांगून कोविड रुग्णालय (COVID Hospital) सुरू ठेवणे अशक्य असल्याचे जाहीर केले आहे. शंभर कोविड रुग्णालये या कारणांसाठी बंद होण्याची भीती आहे आणि आधीच खाटांची-व्हेंटिलेटर्सची अनुपलब्धता, रेमडेसिवीरसाठीची वणवण, प्राणवायूअभावी होणारे मृत्यू हे सारं सुरू असताना शंभर रुग्णालये बंद म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असंच होणार आहे.

पुण्यासारख्या शहरात ही स्थिती आहे तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातली स्थिती विचारायलाच नको. असं असताना उच्च न्यायालयात राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र दिलंय आणि त्यानुसार राज्यात रेमडेसिवीर आणि प्राणवायूचा पुरेसा साठा आहे, असं राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं आहे. उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल झाल्या असून त्याबद्दलची सुनावणी ४ मे २०२१ ला होणार आहे. पण राज्य सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलंय. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी यासंदर्भात न्यायालयात असं सांगितलं की, लोक रेमडेसिवीरची (Remdesivir) गरज नसताना ते नाहक खरेदी करत आहेत. त्यामुळे तुटवडा भासतोय; पण राज्यातला साठा पुरेसा आहे.

राज्यात १ मेपासून १८ वर्षांवरच्या सर्वांना लस उपलब्ध होईल; पण लोकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जेव्हा जेव्हा जनतेला काही ना काही आवाहन केले आहे किंवा जनतेला उद्देशून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून काही सांगितले आहे, तेव्हा तेव्हा त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात कोणत्याही गोष्टी लख्खपणे पडतील असं काहीही सांगितलेलं नाही. उलटपक्षी गोंधळ कसा वाढेल, हेच त्यांच्या प्रत्येक संवादातून किंवा विसंवादातून घडले आहे. त्यामुळेच मग सुरुवातीला त्यांचं फेसबुक लाइव्ह झालं त्यानंतर आपल्याला कोरोनाबरोबर राहायची सवय करून घ्यावी लागेल; पण कोरोनाची तयारी आहे का आपल्याबरोबर राहायची… किंवा लॉकडाऊनच्या काळात माझे केस वाढले आहेत… तुमचेही वाढले असतील… किंवा मी तुमच्याशी बोलू शकतोय आणि तुम्ही माझं म्हणणं ऐकू शकताय; पण मला तुमचं म्हणणं ऐकू येत नाहीये… अशी चाइल्डिश विधानं त्यांनी वारंवार केली आणि त्याच पठडीतलं हे ताजं वक्तव्यं.

लस १ मेपासून उपलब्ध होईल; पण तुम्ही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका, याचा नेमका काय अर्थ घ्यायचा? हे आवाहन करायचं तर सरकारनं नीटपणे लोकांना लसीसाठी नोंदणी करण्याची आणि बँकेत टोकन नंबर देतात तसं क्रमांक देऊन त्याची यादी रीतसर ऑनलाईन जाहीर करावी आणि तितक्याच लोकांना पूर्वनियोजित वेळ देऊन लसीकरण केंद्रावर बोलवावं. लोकांच्या निवासाच्या जागेपासून जवळची केंद्रे नेमून द्यावीत, म्हणजे कोरोना काळात लोकांना फिरण्याचा त्रास होणार नाही आणि लस नसताना लसीकरण केंद्रावर गर्दी करून नंतर निराश होऊन घरी परतावंही लागणार नाही.

लसीकरण केंद्रांवर गर्दी झाल्यानंतर आणि अगदी पंचाहत्तरीच्या वृद्धांनाही तीन तीन तास तिष्ठत राहूनही लस मिळाली नाही, हे गेल्या आठवड्यातले पुण्यातले वास्तव आहे. असं असताना १८ वयावरच्यांची गर्दी होऊ लागली तर काय होईल, याची कल्पनाही करता येत नाही. मुळात उपलब्ध लसींच्या तुलनेतच माणसं केंद्रांवर येतील, हे बघायला हवं. गर्दी झाली तर गर्दीचं मानसशास्त्र जसं असतं तशीच गर्दी वागते आणि त्यातूनच काही अनुचित प्रकार घडून त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लस घ्या पण गर्दी करू नका, हे मामु म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांचं ताजं विधानही त्यांच्या मनातला गोंधळ स्पष्ट करणारंच आहे.

जसा नेता तसं सरकार, या न्यायानं मग राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिलेलं प्रतिज्ञापत्र आणि त्यात म्हटल्याप्रमाणे रेमडेसिवीर आणि प्राणवायू पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, याचा विचार करावा लागतो. कोणालाही रेमडेसिवीर उपलब्ध झाले नाही किंवा प्राणवायूअभावी जीव जायची वेळ आली तर थेट वर्षा बंगला किंवा मातोश्री बंगल्यावर कूच करा आणि मागा रेमडेसिवीर किंवा प्राणवायू. तुमची मागायची तयारी असेल हो; पण त्यांची द्यायची तयारी आहे का, हा खरा प्रश्न आहे.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button