डॅनी म्हणतो, परवीन बाबीला जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी उभा राहिलो होतो

Maharashtra Today

परवीन बाबी (Parveen Babi) म्हणजे बॉलिवूडमधील सुंदर आणि बिनधास्त अभिनेत्री. बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांमध्ये तिचा समावेश होता आणि तिला सिनेमात घेण्यासाठी निर्मात्यांची रांग लागत असे. बॉलिवूडमधील प्रत्येक मोठ्या नायकाबरोबर आणि निर्मात्याबरोबर परवीनने काम केले होते. पण नंतर तिला मानसिक आजार झाला आणि त्यातून ती शेवटपर्यंत बाहेर आली नाही. परवीन बाबीची बॉलिवूडमधील अनेकांसोबत प्रेम प्रकरणेही झाली. पण एकही प्रेम प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले नाही. परवीन बाबी आणि डॅनी डेंजोपा (Danny Denzongpa) ही सीरीयस रिलेशनमध्ये होते. डॅनी खलनायक म्हणून लोकप्रिय असला तरी परवीनला तो आवडला होता. मात्र अमिताभने डॅनीला मित्र म्हटल्याने परवीनने डॅनी अमिताभचा एजंट असल्याचे म्हणत नाते तोडले होते. डॅनीनंतर परवीन बाबी अगोदर कबीर बेदी आणि नंतर महेश भट्टसोबत डेट करू लागली होती. डॅनीने नुकतेच एका मुलाखतीत परवीन बाबीसोबतच्या संबंधांबाबत वक्तव्य केले असून परवीनला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा मी उभा राहिलो होतो असे म्हटले. या मुलाखतीत त्याने परवीन बाबीसोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला.

डॅनीने परवीनसोबतच्या प्रेमाबाबत बोलताना सांगितले, ‘आम्ही दोघे तरुण होतो. जवळ जवळ चार वर्ष आम्ही दोघे एकत्र राहात होतो. त्या काळात ही फार मोठी गोष्ट होती. आम्ही खूप चांगला वेळ घालवला पण नंतर आम्ही वेगळे झालो. वेगळे झाल्यानंतरही आम्ही दोघे एकमेकांचे मित्र होतो. परवीन आणि मी जुहूत एकाच कॉलनीत राहात होतो. ती मला नेहमी जेवायला घरी बोलवायची. खरे तर नंतरच्या काळात मी अभिनेत्री किमसोबत डेटिंग करीत होतो. किमला मी शूटिंग पॅकअप झाल्यानंतर थेट घरी घेऊन येत असे. तर घरात माझ्या बेडरूममध्ये परवीन व्हीसीआरवर सिनेमे पाहाताना आढळायची. मी परवीनला सांगितले होते, असे करू नको. पण ती ऐकत नव्हती. ती किमला सांगायची, आम्ही चांगले मित्र आहोत. एक दिवस मी तिच्या घरी जेवायला गेलो असता ती एकटीच बसली होती. टेबलवरची चांदीची प्लेट मी उडवली तर ती एकदम दचकली होती. महेश भट्ट ने तेव्हा मला सांगितले होते की, परवीन लगेचच घाबरते. त्यामुळेच ती एकटी राहात आहे. एक दिवस महेश भट्टने सांगितले की, परवीनची तब्येत ठीक नाही तिला हिस्टेरिया (Hysteria) झाला आहे. परवीन बाबी पॅरॉनॉईड स्किझोफ्रेनिया (Paranoid Schizophrenia) ची शिकार होती आणि ती उगाचच सगळ्यांना घाबरू लागली होती. ती मलाही घाबरत होती. असेही डॅनीने या मुलाखतीत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button